सचिन जाधव, साम टीव्ही
लोणावल्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मुकबधिर अल्पवयीन मुलीशी नराधमाने अश्लील चाळे करत विनयभंग केला आहे. या प्रकरणाची माहिती मुलीने इशाऱ्यानेच आपल्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने ५ वर्षांची सक्तमजुरी आणि २,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेश दिले आहेत.
दीपक सुधीर मंडल (वय २८, मूळ राहणार आसाम) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ७ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली होती. पीडित मुलगी घराच्या ओट्यावर बसली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. तिला मिठी मारली. अश्लील स्पर्श करत तिचा विनयभंग केला. पीडित मुलगी तेव्हा प्रचंड घाबरली आणि घराकडे पळून गेली.
घरात गेल्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला इशाऱ्यानेच सांगितला. आईने तातडीने बाहेर जाऊन पाहिल्यानंतर आरोपीने तोपर्यंत पळ काढला होता. पीडिताच्या वडिलांनी पाठलाग करून पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.त्यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली.
पीडित अल्पवयीन मुलगी लहानपणापासूनच विशेष मुलगी आहे. ती जास्त बोलत नाही. तिला इशाऱ्याची भाषा कळते. ती इशाऱ्यानेच बोलते. तिने तपासात इशाऱ्यानेच घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. आरोपी समोर आल्यानंतर पीडित मुलगी न्यायालयातच रडली. न्यायालयात तिने आरोपीला ओळखले. त्याने केलेले कृत्य इशाऱ्याने दाखवत ती रडली.
या बाबी न्यायालयाने नोंदवून घेतल्या. तसेच आरोपीविरोधात न्यायालयाने ५ वर्षांची सक्तमजुरी आणि २,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी पीडितेला न्याय मिळाला असून, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.