दहा वर्षांपासून आडिवलीतील रस्ते दयनीय स्थितीत असून काम प्रलंबित
महिलांनी महापालिका अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक श्राद्ध करून अनोखे आंदोलन केले
खराब रस्त्यांमुळे अपघात, मुलांचे व महिलांचे हाल वाढले असल्याचा आरोप
पालिकेने रस्ता केला नाही तर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
टॅक्स भरतो, मग रस्ता कुठे? या संतप्त घोषणांनी आज केडीएमसी मुख्यालय परिसर दणाणून गेला. आडिवली परिसरातील खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या आई एकविरा महिला मंडळा तर्फे महापालिका अधिकाऱ्यांविरोधात अनोखे आंदोलन छेडण्यात आले. मंडळाच्या सदस्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला.
गेल्या दहा वर्षांपासून आडिवली परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने आई एकविरा महिला मंडळाने अडीच वर्षांपासून सतत पाठपुरावा केला. अखेर पालिकेने लिहून पाच महिन्यांत रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले. मात्र, मुदत संपून अनेक महिने उलटून गेले तरी रस्ता डांबरीकरणाचा एकही ठोस प्रयत्न दिसत नसल्याचा आरोप महिलांनी केला.
आज संतप्त नागरिकांनी आंदोलनादरम्यान "दंड वसूल करायला येता, पण सुविधा द्यायला नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिका, काव काव – आडिवलीचा रस्ता खाव खाव" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या खराब रस्त्यांमुळे लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, गर्भवती महिला, वयोवृद्ध यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा अपघातही घडल्याची माहिती नागरिकांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पत्रव्यवहार, मागण्या आणि पाठपुरावा करत आहोत. महापालिकेने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आम्ही टॅक्स भरतो, मग आम्हाला सुविधा का मिळत नाहीत? महिलांना आणि मुलांना होणारा त्रास नजरेआड केला जातोय. त्यामुळेच प्रतीकात्मक श्राद्ध करून आमचा रोष व्यक्त केला.अशी प्रतिक्रिया सोनीताई यांनी दिली.
त्याच बरोबर नागरिकांनी सांगितले रस्त्यांची अवस्था एवढी वाईट आहे की दररोज अपघाताची भीती वाटते. गाडी, बाईक, रिक्षा घेऊन जाणं अवघड आहे. महापालिका टॅक्स मात्र वेळेवर घेते, पण सुविधा मात्र शून्य. आता रस्ता तयार झाला नाही तर रस्ता रोको आंदोलन उभारण्याचा इशारा महिलांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.