Chandani Chowk Flyover News: वाहतूक कोंडीपासून त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहरातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला असून यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
पुढील ५० वर्षांचा विचार करुन पुण्यातील चांदणी चौक पुलाची उभारणी करण्यात आली आहे. दिवसाला जवळपास दीड लाख वाहने या उड्डाणपुलावरून सुसाट धावू शकतील. या पुलासाठी १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यात सतत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे चांदणी चौकात नवा उड्डाणपूल बांधण्याची योजना पुढे आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. पण काही कारणास्तव हे काम रखडले होते.
२०१९ मध्ये प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. येथील काम आणखी सोयीस्कर होण्यासाठी मागच्या वर्षी चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात आला होता. भूमिपुजनानंतर तब्बल ६ वर्षांनी हे काम पुर्णत्वास जात असून त्याचे आज उद्घाटन झाले आहे.
या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपस्थित होते.
साताऱ्याकडून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन आता तीन लेन
मुंबईवरुन साताऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन आता तीन लेन
मुळशीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
बावधन, मुळशी आणि एनडीएकडून कोथरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
बावधनकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती.
प्रकल्पासाठी ८६५ कोटी रुपये खर्च
८३ हजार क्यूबिक मीटर क्राँक्रीटचा वापर
५ हजार ७५० मेट्रिक टन स्टीलचा वापर
मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने सेवा रस्ते
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.