सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune GBS News Update : पुण्यातील जीबीएस आजाराच्या रूग्णांची संख्या १८० वर पोहचली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात जीबीएसचे रूग्ण वाढत आहेत. दूषित पाण्यामुळे जीबीएसचा आजार फोफावत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झालेय. त्यामुळे पाणी उकळून प्यावे, असे आवाहन मनपाकडून करण्यात आलेय.
दरम्यान, पुण्यात जीबीएस आजारातील आतापर्यंत ७९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील जीबीएस बाधितांची संख्या १८० पर्यंत पोहचली आहे. त्यातील ७९ जण बरे झाले आहेत, तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.५८ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मागील तीन आठवड्यापासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात दूषित पाणी आणि अन्न सेवनामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखीच्या समस्या वाढल्या आहेत. त्यातच जीबीएस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषतः धायरी, नांदेडगाव, सिंहगडरस्ता, किरकटवाडी, खडकवासला या भागातील रुग्णसंख्या अधिक आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात १८० संशयित बाधितांपैकी १४६ रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. त्यामध्ये सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये ३५ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या (८८) ही समाविष्ट गावातील आहे. २५ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, २४ रुग्ण पुणे ग्रामीण तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यांतील आहेत.
जीबीएस' नियंत्रणात यश आरोग्यमंत्र्यांचा दावा
पुणे शहरासह जिल्ह्यातील गुईलेन बॅरै सिंड्रोम (जीबीएस) रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून जे प्रयत्न केले, त्याला यशही आले आहे. आता यामध्ये दूषित पाणीपुरवठा करणाऱ्यांसह अन्य दोषींवर कारवाई करण्यासाठी शासन निश्चित काम करेल. खडकवासला धरणक्षेत्रासह वरील भागात असलेल्या हॉटेल्समधून येणारी ड्रेनेज लाइन, पोल्ट्री फार्म यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. ज्या भागात टँकरने पाणीपुरवठा होतो, त्याठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. केंद्रीय पथकाकडून तयार केलेल्या अहवालावर अभ्यास सुरू असून, अंतिम निष्कर्ष येईल असे आरोग्य मंत्री यांनी सागितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.