अवघ्या दोन वर्षांची अफ्सा या चिमुकलीला गंभीर लिव्हरच्या कॅन्सरचं निदान करण्यात आलं होतं. हा कॅन्सर लिव्हरच्या आत आणि महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पसरल्यामुळे सामान्यपणे जी शस्त्रक्रिया केली जाते ती करणं अशक्य होते. पण परळच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये तिला नवजीवन मिळालंय. भारतात पहिल्यांदाच या रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुंतीची Ex-situ लिव्हर ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली.
अफ्साच्या आईला तिच्या पोटात सूज दिसून आली. यानंतर तिची तपासणी केली असता, ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुदलियार यांनी तिला हेपॅटोब्लास्टोमा असल्याचं निदान केलं. हा लहान मुलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य लिव्हरचा कॅन्सर आहे. मात्र अफ्साच्या बाबतीत गाठ यकृताच्या मध्यभागी आणि रक्तवाहिन्यांमध्ये पसरल्याने पारंपरिक शस्त्रक्रिया करणं अशक्य होतं.
केमोथेरपीमुळे गाठीचा आकार कमी झाला, पण तिचं स्थान धोकादायक असल्याने लिव्हर ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम पर्याय होता. मात्र दाता उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी Ex-situ ऑटो ट्रान्सप्लांट या दुर्मीळ पद्धतीचा वापर केला. यात संपूर्ण लिव्हर शरीराबाहेर काढून थंड तापमानात सुरक्षित ठेवलं जातं. त्यानंतर ट्यूमर काढून टाकून रक्तवाहिन्यांची पुनर्रचना केली जाते आणि निरोगी लिव्हर पुन्हा शरीरात बसवले जाते.
या प्रक्रियेत ऑक्सिजनेटेड हायपोथर्मिक मशीन प्रिझर्वेशन तंत्रज्ञान वापरण्यात आलं. हे मशीन शरीराबाहेर असतानाही लिव्हरला रक्तपुरवठा होतो. ज्यामुळे लिव्हरचं नुकसान कमी होतं. ही पद्धत लिव्हरच्या कॅन्सरसाठी क्वचितच वापरली जाते आणि मुलांमध्ये तर प्रथमच वापरली गेली.
या चिमुकलीवर उपचार करताना संपूर्ण लिव्हर बाहेर काढल्यानंतर दोन टीम्सनी एकत्र काम केलं. एक टीम लिव्हरमधून ट्यूमर काढून काढत होती. तर दुसरी टीम शरीरातील रक्तवाहिन्यांची गुंतागुंतीची दुरुस्ती करत होती. ही शस्त्रक्रिया जवळपास १४ तास सुरु होती.
शस्त्रक्रियेनंतर अफ्साला आठवड्याभरात आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आणि नंतर घरी सोडण्यात आलं. पुढील केमोथेरपी आणि तपासण्या आवश्यक असल्या तरी तिला नवजीवन मिळालंय.
अफ्साचे वडील सद्दाम हुसेन शेख म्हणाले, "आम्ही खूप घाबरलो होतो. ही शस्त्रक्रिया आमच्यासाठी शेवटची आशा होती. आज आमची मुलगी पुन्हा हसताना पाहून आम्हाला वाटतंय की, हा एक चमत्कार आहे. आम्ही डॉक्टरांचे कायम ऋणी राहू."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.