उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कल्याण-डोंबिवली शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि सुविधा हस्तांतरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पांचे भूमिपूजन, बाधितांना सदनिकांचे वाटप, दामिनी पथकाला १६ दुचाकी वाहनांचे वितरण, तसेच युवकांसाठी अत्याधुनिक ट्रेनिंग सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे सात हजार युवकांना दर्जेदार व अद्यावत प्रशिक्षण मिळणार असून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराचे नवे दार खुले होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधत म्हणाले, खऱ्या अर्थाने स्वच्छता हे आपले धोरण, ध्येय आणि भूमिका आहे. चेन्नई पॅटर्नची चर्चा होते, पण कल्याण-डोंबिवलीने त्यापेक्षा पुढे जाऊन देशात नंबर एकचे शहर व्हावे, असे काम व्हायला हवे.
ते पुढे म्हणाले, कल्याण हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. या शहराची आगळीवेगळी ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला असून, सर्व रस्ते काँक्रीटचे केले जात आहेत. खड्डे हा शब्द आता इतिहासजमा होणार आहे. शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या टीमचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय सुरक्षेवर भाष्य करताना, उपमुख्यमंत्री म्हणाले, पूर्वीचा भारत राहिला नाही, आता घुसखोरी करणाऱ्यांना प्रत्युत्तर देणारा भारत आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे आपल्या सैन्याचे सामर्थ्य दाखवणारे यशस्वी मिशन ठरले आहे. दहशतवाद संपेपर्यंत हे ऑपरेशन चालूच राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.
याच अनुषंगाने खासदार श्रीकांत शिंदे हे लवकरच भारताचे प्रतिनिधित्व करत एक शिष्टमंडळ घेऊन इतर देशांत जाणार आहेत. पाकिस्तानने आजवर दहशतवादाला कसा पाठिंबा दिला, हे जागतिक पातळीवर मांडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.'ऑपरेशन सिंदूरचा दणका पाहून पाकड्यांचे झाले वांदे दहशतवादाचा बुरखा फाडण्यासाठी चालला आहे श्रीकांत शिंदे' असे बोलत एकनाथ शिंदे यांनी फटकेबाजी केली.
शेवटी शिंदे म्हणाले, आम्ही प्रिंटिंग झाली म्हणणारे सरकार नाही, जे बोलतो ते करतो. मी मुख्यमंत्री असताना हातात झाडू घेतला आणि रस्ते धुतले. आम्ही केवळ घोषणा करत नाही, प्रत्यक्ष कृतीत विश्वास ठेवतो, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.