Will Shiv Sena get Mumbai mayor in upcoming BMC elections : महापालिका निवडणुकीच्या आधी महायुतीमधील धुसफूस संपल्याचे दिसतेय. विधिमंडळाच्या अधिवेशनात एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचे कौतुक करण्यात आले तर दुसरीकडे बावनकुळेंनी निवडणुका एकत्रच लढणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून भाजप अन् शिवसेनेमध्ये तणावाचे वातावरण होते. मुंबई मनपा निवडणुकीबाबत दोन्ही पक्षाकडून तडजोड करण्यात आली. एकनाथ शिंदेंकडूनही सावध भूमिका घेतल्याचे दिसतेय. मुंबईचा महापौर शिवसेनेचा असेल का? असा सवाल शिंदेंना विचारला असता त्यांनी सावध उत्तर दिले.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडालाय. पण सर्वांच्या नजरा या मुंबई मनपाकडेच आहेत. जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईवर कोण राज्य करणार? याचा निर्णय पुढील काही दिवसात होईलच. पण याबाबत मुंबईचा महापौर कोण असेल? याबाबत चर्चेला उधाण आलेय. मुंबईचा महापौर शिवसेनेचा असेल का? असा थेट सवाल शिंदेंना विचारण्यात आला. यावर त्यांनी सावध उत्तर दिले. एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेनेचाच महापौर असेल असा दावा करणं टाळले. त्यांनी मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल असे उत्तर दिले. मागील २५ वर्षांपासून मुंबईवर शिवसेनेचं एकहाती वर्चस्व आहे. पण शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यातीलच गणिते बदलली आहेत. त्यामुळे मुंबईत काय होणार? ठाकरेंची पुन्हा सत्ता येणार का? याचीही उत्सुकता लागलेली आहे. दुसरीकडे मुंबईसाठी भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबईत सत्ता हवीच आहे. भाजपकडून शिंदेंना ठाणे अन् मीरा भाईंदरमध्ये महापौरपद ऑफर केले, त्याशिवाय मुंबईत आमचाच महापौर असेल, त्यात तडजोड नसेल, असे सांगितल्याची राजकीय चर्चा आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंची ताकद कमकुवत झाल्याचं दिसले. त्यामुळे ठाकरेंच्या हातून मुंबई जाणार का? असा सवाल उपस्थित होत होता. पण ठाकरेंकडून नवा डाव टाकण्यात आला. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे हे भाऊ एकत्र आले. १९ वर्षांनंतर दोन्ही बंधू एकत्र आल्याने राजकीय गणिते बदलली आहेत. मुंबई मनपासाठी राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे निवडणुकीतील स्पर्धा आणखी रंजक झाली. मुंबई अन् कोकणातील लोकांवर ठाकरेंचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही भावांची ताकद एक झाल्याने आता नवीन राजकीय समीकरण उभा राहिलेय.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय समिकरणे बदलली आहेत. याबाबत एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली. सर्व पक्षांना युती करण्याचा अधिकार आहे. विकास आणि कल्याणकारी योजना हा आमचा अजेंडा स्पष्ट आहे. ग्रामीण स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे कुटुंबाला रस नसल्याचे म्हणथ त्यांनी निशाणा साधला. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे पालन करत आहोत, असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना अन् भाजप यांच्यामध्ये ठिणगी पेटली. दोन्ही पक्षातील नेत्यांच्या वक्तव्याने अन् देहबोलीने महाराष्ट्राच्या राजकीय गणिते बदलली. महायुतीमधील नाराजी अनेकदा दिसून आली. सध्या शिवसेना-भाजप यांच्यातील कलह कमी झाला असला तरी पडद्यामागील संघर्ष काही थांबेल अशी चिन्हे नसल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.