अक्षय बडवे, साम टीव्ही
पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक थरकाप उडवणारी घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कारचालकाने रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे. (Latest Marathi News)
अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी (Pune Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी दारुड्या कारचालकासह त्याच्या सहकाऱ्याला अटक केली आहे. या भयानक घटनेनं पुणेकरांना संतोष माने घटनेची आठवण करुन दिली आहे.
विश्वनाथ उपादे, असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर उमेश हनुमंत वाघमारे (वय ४८ वर्ष) असे कारचालकाचे (Pune Car Accident) नाव असून नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय ४४ वर्ष) असे गाडीमालकाचे नाव आहे. या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश हनुमंत वाघमारे आणि त्याचा मित्र नटराज हे दोघे दारू पिऊन बेफामपणे गाडी चालवत होते. दरम्यान, कार अलका चौक मार्गावर आली असता उमेश याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कारने रस्त्यावर जात असणाऱ्या विश्वनाथ उपादे यांना उडवले.
यानंतर कारने दोन दुचाकी आणि एका प्रवासी रिक्षाला जोरदार धडक देत शेवटी एका लाईटच्या पोलाला जाऊन धडकली. यामध्ये पायी चालत जाणाऱ्या विश्वनाथ उपादे यांचा मृत्यू झाला तर दोन ते तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारचालक आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.