'मी ४.३० पर्यंत पोहोचतोय, जरा जेवणं तयार ठेव. खूप भूक लागलीये,' असेच काहीसे शब्द बोलून समीर जाधव यांनी फोन ठेवला. त्यांची बायको तयारीला लागली. पण यानंतर पुन्हा त्या दोघांचं बोलणं होऊच शकलं नाही. दिंडोशी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल असणाऱ्या समीर जाधव यांचा मृत्यू झाला. एका अजाणत्या क्षणी मांजाने त्यांचा गळा चिरला आणि गंभीर जखमी झालेल्या समीर जाधव यांचा जीव गेला.
४.३० पर्यंत येतो सांगून त्यांनी फोन ठेवला खरा, पण अजून आले कसे नाहीत, म्हणून त्यांच्या पत्नीला काळजी वाटत होती. काय करावं सूचत नव्हतं. दत्त जयंतीसाठी समीर जाधव हे आपल्या बायको आणि जुळ्या मुलांसोबत गावी जाणार होते. मंडणगडला दत्त जयंतीला जायची तयारी पूर्ण झाली होती. तिकीटंही रेडी होती. पण असं काही होईल, अशी पुसटशीही कल्पना कुणाला नव्हती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
समीर यांची पत्नी अमृता, त्यांची ८ वर्षांची मुलगी स्वरा आणि दोन जुळे बहीण भाऊ स्वरा आणि अर्णव यांच्यासमोर नियतीने क्रूर खेळ केलाय. एका मांजाने जाधव कुटुंबाच्या काळजाचे तुकडे केलेत. (Latest Marathi News)
२४ डिसेंबरचा रविवारचा दिवस पावणे चार वाजताची वेळ, समीर दिंडोशी पोलीस ठाण्यातून पार्किंग लॉटमध्ये येत होते. घरी यायला निघालोय हे सांगण्यासाठी समीर यांनी अमृताला व्हिडीओ कॉल केला. भूक लागलीय ४.३० पर्यंत पोहोचतो घरी, असं सांगून त्यांनी फोन ठेवला. पण संध्याकाळी ६ वाजले तरी ते घरी पोहोचले नव्हते.
मनात शंका येऊ लागली होती. काळजीनं मन कासावीस झालं होतं. अखेर संध्याकाळी ज्याची भीती वाटत होती. ते सांगणारी बातमी अमृता यांना कळली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. समीर बाईकने घरी जायला निघाला. दिंडोशीवरुन तो वाकोला ब्रिज इथं पोहोचला. इतक्यातच मांजाने त्याचा गळा चिरला आणि होत्याचं नव्हतं झालं.
समीर यांच्या मृत्यूने जेवढा धक्का अमृताला बसलाय. तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त मोठं संकट हे समीर यांच्या आईवडीलांवरही कोसळलंय. समीर वरळीच्या बीडीडी चाळीत राहायला होते. तिचे आईवडी आणि दोन वर्षांचा मुलगा अर्णव हे मंडणगडला गावी राहायचे. गावाशी समीर यांची नाळ जोडलेली होती. गावी घर बांधायचं, हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. पण ते स्वप्न एका मांजानं उद्ध्वस्त केलंय. नवऱ्याचं स्वप्न, मुलांची शिक्षणं, गावचं घर, या सगळ्या गोष्टी आता अमृता एकटी कशी पूर्ण करणार? हा प्रश्न अस्वस्थ करणाराय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.