मुंबई: काल, गुरुवारी राज्याच्या राजकारणाने १८० डिग्री यू-टर्न घेतला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कालच्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने फडणवीस नाराज आहेत अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहास केवळ देवेंद्र फडणवीस हेच असे नेते नाही की, ज्यांना मुख्यमंत्रिपद भोगल्यानंतर कनिष्ठ पद मिळालं आहे. राज्याच्या राजकीय इतिहासात आणखी ४ मुख्यमंत्र्यांना नंतर कनिष्ठ पदावर समाधान मानावं लागलं होतं. कोण आहेत ते चार मुख्यमंत्री ज्यांना नंतर कनिष्ठ पदावर जावं लागलं, पाहूयात... (Devendra Fadnavis Latest News)
देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटली तेव्हा फडणवीस यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या गटाला पाठिंबा दर्शवत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण ते सरकार फार काळ टिकले नाही. पुरेशी संख्याबळ जमवता न आल्याने त्यांना तीन दिवसांत राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या आधीही चार माजी मुख्यमंत्री होते, ज्यांनी नंतर कनिष्ठ पदाची जबाबदारी सांभाळली. यात १९७५ मध्ये काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या जागी वसंतदादा पाटील येण्यापूर्वी त्यांनी दोन वर्षे हे पद भूषवले होते. नंतर १९७८ मध्ये कॅबिनेट मंत्री शरद पवार यांनी सरकार पाडले आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. पवारांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही आघाडीच्या या सरकारमध्ये शंकरराव चव्हाण अर्थमंत्री झाले.
शिवाजीराव पाटील निलंगकर १९८५ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. जून १९८५ ते मार्च १९८६ पर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले. अनेक वर्षांनी सुशीलकुमार शिंदे यांचे सरकार आले तेव्हा त्यात शिवाजीराव पाटील यांना महसूलमंत्री करण्यात आले.
१९९९ मध्ये नारायण राणे शिवसेनेत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांचा कार्यकाळ एका वर्षापेक्षाही कमी राहिला. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये ते महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.
२००८ ते २०१० दरम्यान काँग्रेस नेते अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर २०१९ मध्ये, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्य चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस नाराज?
भाजपमध्ये सगळं आलेबल आहे असं दिसत असलं तरी महाराष्ट्र भाजपमध्ये अस्वस्थता आहे. महाराष्ट्र भाजपचा चेहरा असलेल्या फडणवीसांना डावललं गेल्याने भाजप आमदार आणि फडणवीस समर्थक नाराज आहेत. केंद्राने फडणवीसांच्या खच्चीकरणासाठी असं केलं का? असा सवाल भाजप कार्यकर्ते दबक्या आवाजात विचारत असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावर बसून मविआ सरकारच्या नाकी नऊ आणले. मविआ सरकारला त्यांनी नेहमीच धारेवर धरलं. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असताना उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला सांगून भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाने फडणवीसांची ताकद कमी करत मोठी रिस्क घेतल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. फडणवीस यांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊनही त्यांनी ट्विटरवर आपलं बायो हे 'महाराष्ट्र सेवक' असं ठेवलं आहे. त्यांनी 'उप-मुख्यमंत्री' असं ठेवणं अपेक्षित आहे. त्यामुळे फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांणा अधिक उधाण आलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.