भाजपच्या माजी प्रवक्ता आरती साठेच्या न्यायाधीश नेमणुकीवरून राजकीय वातावरण तापले.
आरती साठेंच्या नेवणुकीवरून संजय राऊत आणि रोहित पवार यांचा भाजपवर घणाघात.
विरोधकांनी निष्पक्ष न्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भाजपच्या प्रवक्ता राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती पदावर नेमणूक करण्यात आली आहे. यावरून राजकारण आता चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच नेते संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत 'न्याययंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचे मोदी-शहांच्या भाजपचे हे कारस्थान आहे.', अशी टीका केली. विरोधकांच्या या टीकेला आता भाजपने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना आरती साठे यांच्या नेमणुकीवरून भापवर निशाणा साधला. ते म्हणाले की,'हे भारतीय न्यायव्यवस्थेचे दशावतार आहेत. याला भारतीय न्यायव्यवस्थेचे दुर्दैव म्हणतात. ज्या व्यक्तींनी भाजप विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे आणि मोदी-शहांच्या चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिले आहे. अशा व्यक्तीला मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नेमणे हे मुंबई हायकोर्टाच्या महान परंपरेला कलंकित करणारे आहे. देशाच्या सर्व घटनात्मक संस्था या आपल्या गुलाम असाव्यात यासाठी निवडणूक आयोगापासून राज्यपालांपर्यंत सगळ्या घटनात्मक संस्थांवर भाजपचे लोक नेमले जातात. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.'
आरती साठे मॅडम यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यापूर्वी इतर पदांचा राजीनामा देऊन कायदेशीर बाबींची पूर्तता जरूर केली असेल, याबाबत कोणतंही दुमत नाही. मात्र ज्यांच्याकडं पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी होती अशी व्यक्ती न्यायासनावरून गुणवत्तेनुसार भाजप किंवा भाजप नेत्याच्या विरोधात निर्णय कसा देईल? याबाबत निश्चितच शंका आहे. असं असेल तर त्यांच्याकडून निष्पक्षपणे न्यायाची अपेक्षा कशी करणार? याबाबत आम्ही कॉलेजियमचे प्रमुख म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींना विनंती केली. ते नक्कीच योग्य तो निर्णय घेतील याबाबत शंका नाही. पण ज्यांनी भाजपाचं प्रवक्तेपद सांभाळलं त्यांचं प्रवक्तेपद आज भाजपाचे विद्यमान प्रवक्ते सांभाळत आहेत, यातच सर्वकाही आलं. त्यामुळं भाजपाच्या प्रवक्त्यांनी अधिक न बोललेलं बरं. बोलायचंच असेल तर भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमानावर तर्कशुद्धपणे बोलावं.आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
भाजपचे प्रदेश मीडिया प्रमुख नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करत रोहत पवारांना उत्तर दिलं आहे. 'रोहितजी पवारांनी आधी इतिहास वाचावा, मग न्यायालयीन नैतिकतेवर व्याख्यान द्यावं. सध्या त्यांच्याकडून नाकाने कांदे सोलण्याचा प्रकार सुरू आहे.लोकशाहीत सर्व पक्षांना समान संधी आहे पण रोहित पवार यांना फक्त स्वतःच्या सोयीनुसार लोकशाही हवी आहे. दीड वर्षांपूर्वी आरती साठेजी भाजपच्या प्रवक्त्या होत्या, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा दावा ते करताहेत मग त्यात मापदंडानं रोहित पवार या न्यायमूर्तींवरही प्रश्नचिन्ह उभं करणार की मूग गिळून गप्प बसणार?'
तसंच, नवनाथ बन यांनी काँग्रेसशी संबंधित ३ व्यक्ती न्यायमूर्ती झाल्याचा दाखला देत रोहित पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, 'रोहित पवारांना काँग्रेसशी संबंधित सर्व न्यायमूर्ती योग्य वाटतात. तेव्हा न्यायपालिका धोक्यात नसते. तर पण पूर्वी भाजपच्या प्रवक्त्या होत्या म्हणून साठेंची निवड अयोग्य वाटते? भाजपशी संबंधित कोणताही माणूस अपात्र आणि काँग्रेसशी संबंधित कुणीही पात्र, ही बिनबुडाची आणि दुटप्पी भूमिका आहे. रोहितजी फक्त प्रसिद्धी आणि राजकीय फायद्यासाठी स्वतःचं हसं करून घेऊ नका.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.