शिवसेनेच्या दोन्ही गटात यंदाही दसरा मेळाव्याच्या जागेवरून जुंपली आहे. दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आगपाखड सुरू आहे. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी इतर ठिकाणी जागा शोधावी लागणार आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा कुठे होणार, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याआधीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे. ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होणार नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ'.
'आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 'छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही. जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता. त्या ठिकाणी आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित करत निशाणा साधला आहे.
'कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे फार महत्त्वाचे आहे. तोंड उघडल्यानंतर रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार ? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवले असून हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे, असेही ते पुढे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 'ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला. त्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर केला. त्याच मैदानातून हिंदुत्वाची अॅलर्जी असलेल्या काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही'.
'बाळासाहेबांचा पवित्र विचार गेल्या वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर याच मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख या नात्याने कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती. त्यामुळे आझाद मैदान आणि क्रॉस मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.