राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करू, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत केली. यानंतर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने विधानभवनमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विधानसभेत केलेल्या घोषणेप्रमाणे लवकरच हे कल्याणकारी मंडळ कार्यान्वीत करावे, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेता शिष्टमंडळाने केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे, संजय पावसे, गोपाळ चौधरी आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमदार संजय केळकर मुख्यमंत्र्यांना म्हणाले, "महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना या ही राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकमेव शिखर संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून गेली १५ वर्षे वृत्तपत्रे विक्री त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे".
"आपण अधिवेशनात याबाबत घोषणा केली आहे. तरी आपण केलेल्या घोषणेची पुर्तता करावी. वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करावे". आमदार केळकर यांच्या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "गेल्या अनेक दिवसांपासून वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेकडून ही मागणी केली जात होती".
"आमदार संजय केळकर यांनी अनेकदा विधानसभेत हा प्रश्न मांडला. अगदी विधानसभा निवडणूक पूर्वी वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठीचे कल्याणकारी मंडळ कार्यान्वित केले जाईल". दरम्यान, अभ्यास समितीने सुचवल्या प्रमाणे, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलती मिळाव्यात, शिष्यवृत्ती मिळावी, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना उच्च शिक्षणात सवलती मिळाव्यात, अशी मागणी पाटणकर यांनी केली.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी आरोग्याच्या खर्चाबाबत मदत मिळावी, उतार वयात वृत्तपत्र विक्रेत्यांना निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळावी, वृत्तपत्र विक्रेत्यांना घरबांधणीसाठी जागा व निधी मिळावा यासह विविध योजनांचा सहभाग वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या मार्फत करावा. तशी शिफारस संघटनेने अभ्यास समितीच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे, असंही पाटणकर म्हणाले.
सरकारने या अभ्यास समितीच्या अहवालाचा स्वीकार करून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी तात्काळ स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गठीत करावे, अशी मागणी करत कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांची स्थिती व कल्याणकारी मंडळाची गरज याबाबत निवेदन दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.