४ ते ७ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सवासाठी विशेष लोकल गाड्या धावणार
सीएसएमटीहून कल्याण, ठाणे व पनवेलकडे मध्यरात्री विशेष लोकल सुटणार
गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त व्यवस्था केली
प्रवाशांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात
गणेशोत्सव हा गणेशभक्तांसाठी जिव्हाळ्याचा सण आहे. लाखो भाविक गणरायाच्या आगमनाला आणि निरोप देण्यासाठी एकवटतात. अशा वेळी शहरात प्रचंड गर्दी होते आणि विशेषतः रेल्वे प्रवाशांचा ओघ वाढतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे तसेच हार्बर मार्गावर अतिरिक्त लोकल ट्रेन धाववण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने ४ सप्टेंबरपासून ते ७ सप्टेंबरपर्यंत गणेशभक्तांना विशेष लोकल गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. गणेश विसर्जनाच्या रात्री उशिरापर्यंत भाविक मिरवणुकांमध्ये सहभागी होतात. मिरवणूक संपल्यानंतर रात्री उशिरा घरी परतण्यासाठी प्रवाशांना नियमित लोकल सेवा पुरेशी पडत नाही. हीच गरज ओळखून रेल्वे प्रशासनाने या विशेष लोकल गाड्या प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून कल्याणकडे १.४० वाजता सुटणारी लोकल पहाटे ३.१० वाजता कल्याणला पोहोचेल. त्याचप्रमाणे सीएसएमटीहून २.३० वाजता सुटणारी लोकल ठाण्याला ३.३० वाजता पोहोचणार आहे. सीएसएमटीहून कल्याणसाठी निघणारी आणखी एक लोकल ३.२५ वाजता सुटेल व ती ४.५५ वाजता कल्याणला पोहोचेल. कल्याणहून सीएसएमटीकडे १२.०५ वाजता सुटणारी लोकल १.३० वाजता पोहोचेल. ठाण्याहून १ वाजता सुटणारी लोकल पहाटे २ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. तसेच ठाण्याहून २ वाजता सुटणारी लोकल पहाटे ३ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे.
हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठीसुद्धा उशिरापर्यंत लोकल उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सीएसएमटीहून पनवेलकडे १.३० वाजता सुटणारी लोकल पहाटे २.५० वाजता पोहोचेल. आणखी एक लोकल २.४५ वाजता सीएसएमटीहून सुटून ४.०५ वाजता पनवेलला पोहोचणार आहे. पनवेलहून १ वाजता सुटणारी लोकल २.२० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या विशेष लोकलमुळे नवी मुंबई, पनवेल परिसरातून मुंबईत येणारे व मुंबईहून परतणारे भाविक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करू शकतील.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे की या सर्व गाड्या सामान्य प्रवाशांसाठी खुल्या असतील व त्यांचे वेळापत्रक स्टेशनवर लावण्यात आले आहे. या अतिरिक्त गाड्यांमुळे मिरवणूक संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शहरात थांबणाऱ्या नागरिकांना घरी परतणे सुलभ होईल.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत पोलिस, वाहतूक विभाग, महापालिका आणि रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करत असतात. यंदाही गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व वेळेत प्रवास करता यावा, यासाठी स्थानकांवर अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.