मुंबईत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला
उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या शिलेदाराला एकनाथ शिंदेंनी फोडले
माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला
अनिल कोकीळ यांनी शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला
मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरेंच्या एका विश्वासू नेत्याने पक्षाची साथ सोडली. माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. त्यांनी तात्काळ शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. बालेकिल्ल्यामध्येच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला त्यामुळे आता याठिकाणी शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शिलेदार फोडला. माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रभाग क्रमांक २०४ मध्ये शिवसेना ठाकरे गटाने अनिल कोकीळ यांना डावलून किरण तावडे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे कोकीळ नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
अनिल कोकीळ प्रभाग क्रमांक २०४ मधूनच निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून वॉर्ड क्रमांक २०४ मधून त्यांना तिकीट देण्यात आले असून त्यांनी एबी फॉर्म देखील भरला असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल कोकीळ हे बेस्ट कर्मचारी होते. बेस्ट कर्मचारी असतानाच ते २०१७ मध्ये नगरसेवक पदी निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना बेस्टचे अध्यक्षपद दिले होते.
महत्वाचे म्हणजे, अनिल कोकीळ यांनी तडकाफडकी राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अर्धा तासांत त्यांना प्रभाग क्रमांक २०४ मधून एबी फॉर्म मिळाला. खासदार मिलिंद देवरा यांनी त्यांना एबी फॉर्म दिला. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता लालबागमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे किरण तावडे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे अनिल कोकीळ यांच्यात सामना रंगणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.