Sujit Patkar Case Update : मुंबईतील कथित कोविड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणात उद्योजक आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात मोठा दिलासा मिळाला आहे. ११ जुलैपर्यंत सुजित पाटकर यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. ( Latest Marathi News)
मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीकडून धाडसत्र सुरू आहे. असं असतानाच उद्योजक सुजित पाटकर यांना विशेष न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचं कंत्राट मिळवण्यासाठी पाटकर यांनी बोगस कागदपत्रे जमा केल्याच्या आरोपाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात सुजित पाटकर यांच्याविरोधात ११ जुलैपर्यंत अटकेची कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.
या प्रकरणात सुजित पाटकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये अनियमितता झाल्याच्या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतील तज्ज्ञांच्या समितीद्वारे चौकशी झाली होती. मात्र, त्यात कोणतीही अनियमितता झाल्याचे आढळून आले नाही, असे पाटकर यांनी अर्जात म्हटले.
पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम दिलासा देण्यात यावा, अशी विनंती पाटकर यांचे वकील सुभाष झा यांनी न्यायालयाकडे केली. मात्र, पाटकर यांना कोणताही अंतरिम दिलासा दिला जाऊ नये, असा युक्तिवाद फिर्यादींच्या वकिलांनी केला. अंतरिम दिलासा मिळावा याकरिता दाखल केलेला अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी विनंती केली. आरोपीने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता निविदा प्राप्त केली. यात वैयक्तिक संबंध आणि प्रभाव यांचा गैरवापर आरोपीने केल्याचा संशय आहे, असे पोलिसांनी सांगितले.
त्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीशांनी पाटकर यांना अंतरिम दिलासा देतानाच, पुढील सुनावणीपर्यंत पाटकर यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले. तसेच या आदेशाचा कोणताही गैरफायदा घेऊ नये, तसेच तपासात सहकार्य करण्याचे आदेश अर्जदार पाटकर यांना दिले.
आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात सुजित पाटकर यांना विशेष न्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी, कथित कोविड सेंटर घोटाळ्यात पाटकर अद्यापही ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.