मयूर राणे, साम प्रतिनिधी
मुंबई: कोस्टल रोडवरुन महायुतीचे सरकार आणि ठाकरे गटात चांगलाच शाब्दिक वाद सुरू झालाय.पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कोस्टल रोडला गळती लागल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. आज सकाळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर आता भाजप नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतलाय. 'विकासकामांच्या वाटेत खोळंबा घालणारे तुम्ही लंडनमध्ये बसून मुंबईची चिंता करता', असा उपरोधिक सवाल करत राम कदम यांनी एका व्हिडिओद्वारे केलाय.
आदित्य ठाकरेंवर टीका करताना राम कदम यांनी त्यांच्या 'श्रीमान युवराज' असा उल्लेख केला . आदित्य ठाकरेंना मुंबईचा उन्हाळा सहन झाला नाही म्हणून ते लंडनला गेलेत. तेथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून त्यांना मुंबईची चिंता सतावत आहे. पण महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी कोणती विकासकामे केलीत असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केलाय. त्याउलट आदित्य ठाकरेंनी कंत्राटदारांकडून कमिशन मिळावे यासाठी विकासकामांना थांबवलेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काय म्हणाले राम कदम
'मुंबईतील कडक उन्हाळा सहन झाला नाही,म्हणून लंडनच्या गुलाबी थंडीत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून श्रीमान युवराज ठाकरे ट्विट करतात. मुंबईची चिंता पडलीय. ते तेथून ट्विट करून मुंबईच्या कोस्टल रोडविषयी त्यांना चिंता वाटू लागलीय. सरकार असताना काय दिवे लावलेत. कोणतं विकासाचं काम केलं. उलट जी कामे देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेत. ती सर्व कामे तुम्ही बंद पाडलीय.कशा बंद पाडलीत. स्वत:चा हट्टहास आणि कंत्राटदारांकडून कमिशन मिळलं पाहिजे म्हणून. हे तुम्ही विसरला असाल, पण मुंबई आणि महाराष्ट्र विसरलेला नाही. विकासाच्या वाटेत खोळंबा घालणारे तुम्ही लंडनमध्ये बसून मुंबईची चिंता करणार'.
आदित्य ठाकरेंची टीका
मविआचे सरकार कायम राहिले असते तर,मुंबई कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता. तसेच नागरिकांसाठी खुला झाला असता.पण भ्रष्ट राजवटीने आमचं सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचं काम केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत १ लेन उघडण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली होती.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
कोस्टल रोडला काहीठीकाणी जॉइंट लीकेज आहेत, मात्र स्कॉटलंडच्या जॉन यांची भेट घेतल्यानंतर मुख्य मार्गाला कोणताही धोका नाही नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. रोडवर २५ जॉइंट आहेत त्याठिकाणी इंजेक्शनद्वारे पॉलिमर जॉइंट केले जातील विशिष्ट टेक्नॉलॉजीने काम केलं जाईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.