केडीएमसी निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का
ठाणे ग्रामीण संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांचा राजीनामा
राजीनाम्याचं कारणही सांगितलं
राजकीय वर्तुळात एकच खळबळ
संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही
निवडणुकांचे वारे जोराने वाहू लागले आहेत. जवळपास राजकीय पक्षांतून आउटगोइंग सुरू आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटातील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांना गळाला लागतील या अपेक्षेने फिल्डिंग लावली जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटात स्थानिक पातळीवर नाराजीनाट्य बघायला मिळतं. मुंबईला लागूनच असलेल्या आणि अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आधीच ठाकरे गटातील नाराजीनाट्य उफाळून आलं आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे ग्रामीणचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तारे यांनी स्वतः या राजीनाम्याचं कारण सांगितलं आहे. विशेष म्हणजे काही दिवस आधीच तारे यांनी व्हॉट्सअॅपवर नाराजीबाबत पक्षप्रमुखांना कळवलं होतं.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील स्थानिक नेत्यांच्या कार्यपद्धतीवर आणि काही निर्णयांवर नाराज असल्याचं तारे यांनी सांगितले. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि निर्णय प्रक्रियेत दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर पदाचा राजीनामा दिल्याचंही ते म्हणाले. याबाबत पक्षप्रमुखांना व्हॉट्सअॅपवर कळवलेही होते. त्यावर रिप्लायही आला होता. आपण दिवाळीनंतर या विषयावर बोलू. पण आपण राजीनामा देऊ नका, असे सांगण्यात आले होते. दिवाळीत स्थानिक पातळीवर अंतर्गत राजकारणामुळे कडूपणा येत होता. म्हणून मी राजीनामा तातडीने दिला असल्याचेही तारे म्हणाले.
साईनाथ तारे हे ठाकरे गटातील सक्रिय आणि अनुभवी पदाधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे ग्रामीणचं संघटनात्मक समीकरण बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीला काही दिवसच शिल्लक आहेत. अशावेळी तारेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला निवडणूक रणनीतीच्या दृष्टीने मोठा फटका बसू शकतो.
तारे यांचा हा नाराजीनामा नेमका कोणत्या कारणामुळं आहे, त्यामागचं खरं कारण काय आहे आणि ते यापुढे कोणतं राजकीय पाऊल टाकणार आहेत, याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तारेंच्या राजीनाम्यावर मात्र ठाकरे गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.