भांडुपमध्ये १७ वर्षीय तरुणाचा भर पावसात विद्युत धक्क्याने मृत्यू.
कानात हेडफोन असल्याने नागरिकांच्या सूचना ऐकू आल्या नाहीत.
स्थानिकांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव वाचले.
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे संतप्त नागरिकांनी सुरक्षिततेची मागणी केली.
मुंबईतील भांडुप परिसरामध्ये काल दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. सतरा वर्षीय दीपक पिल्ले या तरुणाचा भर पावसात विद्युत धक्क्यामुळे मृत्यू झाला. पन्नालाल कंपाऊंड परिसरात ही घटना घडली असून, अचानक झालेल्या या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दीपक हा एल बी एस मार्गावरून आपल्या घराकडे निघाला होता. पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले होते. या भागातूनच महावितरणची हाय टेन्शन वायर खुली पडली होती. दीपक कानात हेडफोन लावून रस्त्याने चालत होता. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यास सांगितले, पण कानात हेडफोन असल्यामुळे त्याला काहीही ऐकू आले नाही. दुर्दैवाने तो त्या उघड्या विद्युत तारेच्या संपर्कात आला आणि क्षणातच त्याला जबरदस्त विद्युत धक्का बसून त्याचा मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी वायर उघडी असल्याने धोका कायम होता. नागरिकांनी अनेकांना या मार्गाने जाताना इशारे देऊन सावध केले होते. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले, परंतु दीपकच्या कानात हेडफोन असल्यामुळे तो आवाज ऐकू शकला नाही. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी या तरुणाचा जीव वाचवता आला नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि महावितरण अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचित केले. मात्र, पावसाळ्यात अशा प्रकारे उघड्या तारा जीवघेण्या ठरत असल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महावितरणला तातडीने सुरक्षिततेची उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात पाणी साचलेल्या रस्त्यांवरून चालताना, विशेषतः विद्युत तारा किंवा खांबाजवळ जाताना नागरिकांनी अधिक सावध राहावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
दीपक पिल्लेच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिकांनी महावितरणला निष्काळजीपणाबद्दल जबाबदार धरून अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.