अजय दुधाणे, साम टीव्ही
अंबरनाथमध्ये खंडणीसाठी 12 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला आइस्क्रीम आमिष दाखवून दोन जणांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर मुलाच्या वडिलांकडे तब्बल 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र अंबरनाथ पोलिसांनी वेगाने तपासची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत मुलाची सुखरूप सुटका केली. तसेच सापळा रचून दोन्ही आरोपींनाही ताब्यात घेतले आहे.
अंबरनाथच्या जावसई परिसरात राहणारा १२ वर्षीय मुलगा परिसरात खेळत होता. यावेळी दोन जणांनी त्याला आइस्क्रीम देण्याचं आमिष दाखवत आपल्यासोबत नेलं. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना व्हॉट्सॲप कॉल करून मुलाच्या सुटकेसाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. या प्रकारानंतर मुलाच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेचं गांभीर्य ओळखून अंबरनाथ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. काही वेळाने अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम घेऊन बदलापूर गावातील वडोदरा-जेएनपीटी महामार्गाजवळ येण्यास सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आधी मुलाच्या वडिलांनी अपहरणकर्त्यांना पैसे देऊन मुलाला सुखरूप ताब्यात घेतलं. त्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला पकडलं.
या संपूर्ण कारवाईत अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या एपीआय सुप्रिया देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. मुख्य आरोपी हकीक सलीम खान याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी अपहरणाचा कट रचल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अर्चना कटके यांनी दिली.अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका झाली आहे.