अक्षय गळवी, साम टीव्ही
अकोला महापालिकेचा अतिशय धक्कादायक निकाल समोर आलेला आहे. मागील महापालिका निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी केली होती. तब्बल 80 पैकी 48 जागा जिंकत महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली. मात्र, यंदा भाजपने 80 पैकी 38 जागा जिंकल्यात. मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांची एक आणि एका समर्थित अपक्षासह भाजपला 40 जागा मिळाल्या. यंदा भाजपच्या 10 जागा घटल्यात. तर काँग्रेसने 13 वरून 21 वर मुसंडी मारली. एमआयएम 1 वरून 3 वर गेली. एकंदरीत भाजपला बहुमतासाठी जोडतोड करावी लागणारेये. दरम्यान, या निकालानंतर भाजपची अकोल्यात पिछेहाट झाल्याचं चित्र आहेये. तरीही अकोल्यात भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसतंये. मात्र, भाजपच्या पिछेहाट मागील कारणे काय? पाहुयात.
पाहिलं कारण, अकोट नगरपालिकेत एमआयएमसोबत घेणं अकोला महापालिका निवडणुकीत भाजपला चांगलंच महागात पडलंय. येथे भाजपने अकोट विकास विचार मंच स्थापन करीत त्यामध्ये एमआयएमला सोबत घेतलं होतं. इतकंच नव्हे तर भाजप नेत्याच्या मुलाला एमआयएमच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक करण्यात आले. एकंदरीत एमआयएमला सोबत घेतल्याने या युतीची मोठी चर्चा झाली, आणि देशभरात भाजप ट्रोल झाली. त्यानंतर अकोला महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या आमदाराहसह नेत्यांनी भाजप आणि एमआयएम युतीवर ताशेरे ओढले. इथेच मुस्लिम मतदार एकवटले आणि काँग्रेसला मोठं यश हाती लागलं.
दुसरं कारण, भाजपने विद्यमान नगरसेवकांसह निष्ठावतांना डावलून इतरांना तिकीट दिलं, त्यानंतर भाजपातील अंतर्गत नाराजीचा फटका बसला असल्याची चर्चा आहे. तिसरं कारण, महायुतीतील घटक पक्ष असलेला शिंदेसेनेने एकला चलो रे चा नारा दिला, त्यामुळं मतांचे मोठं विभाजन होत त्याचाही फटका भाजपला बसला. प्रभाग 17 मध्ये काँग्रेसला मोठं यश आलंये, गेल्या काळात या ठिकाणी शिवसेनेचे चार नगरसेवक विजय झाले होते. मात्र, यंदा भाजपने इथं करण शाहूला उमेदवारी दिली, त्यामुळं इथला मुस्लिम मतदार एकवटला आणि काँग्रेसकडे वळला, त्यात शिंदे सेनेच्या उमेदवारांमुळे हिंदू मतांत मोठे विभाजन झालंये. याचाच फायदा काँग्रेस झाला आणि इथे 3 जागा जिंकल्या.
प्रभाग 13 मधून भाजपने विद्यमान नगरसेवक आशिष पवित्रकार यांचे तिकीट कापलं. अन अनिल मुरुमकारला मैदानात उतरवलं. पवित्रकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणारे माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे आहेत. ऐनवेळी पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी हत्यार उपसलं. इथे मुरूमकार यांचा पराभव करीत पवित्रकार अधिक मतांनी विजयी झाले. मात्र, अनेक दिग्गजांचे तिकीट कापल्याने पक्षात नाराजीचा सूर उमटला, तोच महापालिका निवडणुकीत दिसलाये.
बहुमताचा आकडा आहे 41. आज भाजपने 80 पैकी 38 जागा जिंकल्यात. तर मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांचा एक आणि भाजप समर्थित अकोला विकास समितीचा एक. असे एकत्रित 40 जागा. असे असले तरी भाजपचा अपक्ष उमेदवार अर्थातच भाजपचा बंडखोर विजयी आशिष पवित्रकार हे देखील भाजपमध्ये घरवापसी करू शकतात. याशिवाय शिंदे सेना या ठिकाणी स्वबळावर लढली आणि एक जागा जिंकली. असे गणित जुळले तर भाजप बहुमताचा 41 आकडा गाठू शकते.
अकोला महापालिका अंतिम एकूण पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 80
जाहीर निकाल ़: 80
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदेसेना : 01
अजित पवार राष्ट्रवादी : 01
शरद पवार राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
मनसे : 00
अकोला विकास समिती : 01
अपक्ष : 01
____________
मागील अकोला महापालिका पक्षीय बलाबल :
पक्ष - सदस्य संख्या.
भाजप : 48
काँग्रेस : 13
शिवसेना : 08
वंचित : 03
राष्ट्रवादी : 05
एमआयएम : 01
अपक्ष : 02
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.