संजय राठोड, साम टीव्ही प्रतिनिधी
ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा असते. या जिल्हा परिषद शाळेत मुलांना जपानी भाषा शिकवली जातेय. यवतमाळच्या पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भाटंबा या लहानशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.
भाषा हे संवाद साधण्याचे उत्तम माध्यम आहे. स्पर्धेच्या युगात जागतिक स्तरावर जपानी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने सांस्कृतिक आणि व्यावसायिक संधी वाढविण्याच्या हेतूने हा उपक्रम सुरु केला आहे. शाळेतील एका शिक्षकाने मुलांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चक्क जपानी भाषा शिकविण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
एकीकडे जिल्हा परिषद शाळेतील मुलांना धड मराठीत बोलता येत नाही, असा सर्वसामान्यांचा गैरसमज असून ते आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण देण्यासाठी नाके मुरडतात. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पंचायत समितीतील काटखेडा केंद्रातील भाटंबा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक महेश चव्हाण हे शाळेतील मुलांना सतत काहीतरी नवीन शिकविण्याची धडपड करतात. त्यांच्या शाळेतील मुलांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेबरोबरच जपानीही ते शिकवितात. आपल्या मुलांनाही परदेशी भाषा आली पाहिजे, या हेतुने ते स्वतः आधी जपानी भाषा शिकले आणि विद्यार्थ्यांनाही ती भाषा शिकविली.
अवघ्या पाच-सहा महिन्यांत शाळेतील विद्यार्थीही त्या भाषेत उत्तम संवाद साधू लागले. यांच्या जपानी भाषेच्या अभिनव प्रयोगामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी भाषा शिकण्याचे दालन खुले झाले आहे. इयत्ता दुसरी ते चौथीपर्यंतचे 23 विद्यार्थी सध्या जपानी भाषा शिकत आहेत.
शिक्षकांना शिक्षण प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना केवळ त्याच इयत्तेच्या अभ्यासात किंवा केवळ वाचन, लेखन या चौकटीत न बांधता त्यांना येत्या काळात भविष्यवेधी शिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगण्यात आल्याने शिक्षक महेश चव्हाण यांनी हा उपक्रम सुरु केला. पदवी शिक्षण विशेष करुन अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर परदेशात जाऊन नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्नं असते. म्हणूनच शालेय शिक्षण सुरू असतानाच विद्यार्थ्यांना विविध भाषांचे ज्ञान असणे आजची गरज आहे, हे ओळखून महेश चव्हाण यांनी प्राथमिक शाळेतच जपानी भाषेचे धडे देण्यास सुरवात केली.
जपानी भाषा शिकवतांना त्यांनी विद्यार्थ्यांना सुरवातीला 2-3 आठवडे यू-ट्यूबवरील जपानी भाषेचे व्हिडिओ दाखविणे,व्हिडिओद्वारे जपानी भाषा ऐकणे, मूलभूत गोष्टी समजू लागल्यानंतर जपानी भाषेतून संवाद साधणे शिकवितात. त्यानंतर जपानी भाषेतील हिरागाना नावाची लिपी शिकविण्यास सुरुवात करतात. पाच-पाच अक्षरे शिकवून त्यांचे वाचन व लेखन शिकवितात.
चार ते पाच ओळींचे छोटे संवाद गटागटाने घेतात. स्वतः इंटरनेटचा वापर करून काही वाक्य शोधून आणून शाळेत सराव करून घेतात. आता हे विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन आणि दैनंदिन संवाद साधण्यात तरबेज झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.