यवतमाळच्या महागाव शहरातील सुकन्या लॉजवर पोलिसांचा छापा
पोलिसांच्या कारवाईत देहविक्रीचा प्रकार उघडकीस
लॉज मालकासह एका महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात
पोलीस पुढील तपास करत आहेत
संजय राठोड, यवतमाळ
यवतमाळमधील महागाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सुकन्या लॉजवर महागाव पोलिसांनी अचानक धाड टाकून देहविक्रीचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत एका महिलेसह लॉज मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ओम हरी भोजनालयाच्या वरील सुकन्या लॉजमध्ये करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकन्या लॉजचा मालक सुनील गव्हाणे हा बाहेरून महिलांना बोलावून लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय करण्यास परवानगी देत असल्याची माहिती महागाव पोलिसांना गोपनीयरीत्या मिळाली होती. तसेच, तो स्वतः मध्यस्थ म्हणून काम करत पुरुष आणि महिलांना लॉजमध्ये खोली उपलब्ध करून देत असल्याची माहितीही पोलिसांच्या निदर्शनास आली होती.
या गोपनीय माहितीची खातरजमा केल्यानंतर महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सुकन्या लॉजवर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी लॉजमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या प्रकारावर कारवाई करत एका महिलेसह लॉज मालक सुनील गव्हाणे याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईमुळे महागाव शहरात खळबळ उडाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणी लॉज मालक तथा चालक सुनील गव्हाणे याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास महागाव पोलीस करत असून, या प्रकारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, शहरातील लॉज आणि हॉटेलमध्ये अशा प्रकारचे अवैध प्रकार सुरू असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. महागाव पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.