पांगरी गावातील व्हायरल व्हिडिओ 2023 सालातील असल्याचे स्पष्ट झाले.
व्हिडिओतील तरुण बापु आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी असून, तो वर्षभरापासून जेलमध्ये आहे.
गावाची बदनामी थांबवावी, अशी पांगरी गावकऱ्यांची मागणी.
पोलिस व प्रशासनाने अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी, असा आग्रह.
बीड जिल्ह्यातील पांगरी गावात गेल्या काही दिवसांपासून एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली होती. या व्हिडिओमध्ये गावाचे नाव घेऊन एक तरुण समाजमाध्यमांवर माफी मागताना दिसत होता. मात्र, या प्रकरणाचे खरे सत्य आता समोर आले असून हा व्हिडिओ नवा नसून 2023 सालातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, व्हिडिओमधील माफी मागणारा तरुण हा परळी तालुक्यातील मरळवाडी गावचा रहिवासी व सरपंच बापु आंधळे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी राजेश नेहरकर आहे.
राजेश नेहरकर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि बापु आंधळे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बबन गिते यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाली आहे. नेहरकर याचा हा व्हिडिओ गावातील ग्रुपवर बबन गिते यांच्या निवडीनंतर केलेल्या पोस्टमुळे झालेल्या वादानंतरचा असून, त्यात त्याने गावकऱ्यांची माफी मागितली होती. हा जुना व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल करण्यात आला असून, यामुळे पांगरी गावाची अनावश्यक बदनामी होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सर्वात महत्त्वाच म्हणजे, राजेश नेहरकर हा गेल्या एक वर्षापासून बापु आंधळे हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे. त्यामुळे त्याचा जुना व्हिडिओ नव्याने व्हायरल करून कोणाच्या फायद्यासाठी किंवा कोणत्या हेतूने गावाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याबाबत गावकऱ्यांमध्ये संताप आहे.
या पार्श्वभूमीवर पांगरी येथील माजी उपसरपंच ॲड. श्रीनिवास मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "गावाची बदनामी करण्यासाठी जुने व्हिडिओ काढून व्हायरल करण्याचे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत. खरे तथ्य समोर येणे गरजेचे आहे आणि गावाची प्रतिमा जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे."
गावकऱ्यांनी प्रशासन आणि पोलिसांकडे अशा प्रकारच्या अफवा व चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणाऱ्या अशा घटनांमुळे गावांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो आणि सामाजिक ऐक्य बिघडते, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये २९ जून २०२४ रोजी गोळीबाराचा थरार घडला होता . या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. यात मरण वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाल्याने हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनला होता. सरपंच बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते याच्यासह मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
व्हायरल झालेला व्हिडिओ कोणाचा आहे?
हा व्हिडिओ बापु आंधळे खून प्रकरणातील आरोपी राजेश नेहरकर याचा आहे.
हा व्हिडिओ केव्हाचा आहे?
हा व्हिडिओ 2023 सालातील असून सध्या आरोपी मागील एक वर्षापासून तुरुंगात आहे.
पांगरी गावकऱ्यांनी काय मागणी केली आहे?
जुन्या व्हिडिओंचा चुकीचा वापर करून गावाची बदनामी करण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बापु आंधळे खून प्रकरण काय आहे?
29 जून 2024 रोजी परळी येथे झालेल्या गोळीबारात सरपंच बापु आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता, ज्यात अनेक आरोपींवर गुन्हा दाखल झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.