- सागर निकवाडे
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याचा दुर्गम भागात शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धेतून आजही डाकीण प्रथा कायम असल्याचे दिसून येत आहे. डाकीण असल्याच्या संशयातून अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात ओघाणी गावाच्या चापडापाडा गावात एका महिलेला मारहाण करत तिला स्मशानभूमीतील राख खाऊ घातल्याचे समोर आले आहे. (Maharashtra News)
नंदूरबार जिल्ह्यापासून साधारण 175 किलोमीटर मोटारसायकल आणि पायी प्रवास करत साम टीव्हीची टीम ओघाणी या आदिवासी पाड्यावर पोहचली. तेथील पिडीत आदिवासी कुटुंबाची भेट घेतली. अंगावर शहारे आणणारा प्रसंग कुटुंबाने साम टीव्ही समाेर कथन केला.
सातपुड्याच्या दुर्गम भागात शिक्षणाचा आणि आरोग्य सेवेचा अभाव आणि त्यातच अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने डाकीण सारखी प्रथा आजही कायम आहे. पाड्या वस्तीमध्ये कोणी आजारी पडले किंवा मयत झाले तर एखाद्यावर संशय घेऊन डाकीण ठरवण्याचे प्रकार घडत असून येथील आरोग्य सेवा चांगल्या करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना पोलीस प्रशासन या घटना गांभीर्यपूर्वक घेत असते. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी जनजागृती केली जाते असे म्हटले. या प्रकरणी मोलगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा सखोल तपास सुरु आहे.
एकीकडे आपण चंद्रावर चांद्रयान पाठविले मात्र आजही दुर्गम भागात शिक्षणाचा अभावी डाकीण प्रथा कायम असल्याचे वास्तव आहे. महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असताना आजही दुर्गम भागात अंधश्रद्धा कायम असल्याने आधुनिक युगात जनजागृती करण्यात कुठेतरी कमी पडल्याचे वास्तव आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.