लातूर : देशभरातून 10 हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात त्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणारी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झाम (FMGE) परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय प्रॅक्टिस करता येत नाही. यासंदर्भातच आता धक्कादायक माहिती समोर आलीय. या परीक्षेत फक्त 15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण (Pass) होत असल्याने 85 टक्के विद्यार्थ्यांच भविष्य अंधारात आहे. सरासरी १० पैकी ८ विद्यार्थी या परीक्षेत नापास होत आहेत. यामुळे साधारणतः साडेआठ हजार विद्यार्थ्यांना परदेशी वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग होत नसून करिअर (Career) बरबाद होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
हे देखील पहा :
आपला मुलगा डॉक्टर (Doctor) बनला पाहिजे या पालकांच्या इच्छेपोटी भारतातून सरासरी 10 हजार विद्यार्थी परदेशी वैद्यकीय शिक्षणासाठी जातात यात रशिया, युक्रेन, बलगेरिया, जॉर्जिया आदी देशात जाण्याचं प्रमाण मोठं आहे. सन 2000 पासून दर वर्षी 10 हजाराच्या आसपास विद्यार्थी परदेशात जातात. हे वैद्यकीय पदवीचे (MBBS) शिक्षण पूर्ण करून परत भारतात येतात. पण, देशात फॉरेन रिटर्न विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एफएमजीई परीक्षा (Exam) उत्तीर्ण व्हावी लागते. या परीक्षेत वर्षाला फक्त 10 ते 15 टक्के विद्यार्थी पास होतात तर उर्वरित 80 ते 95 टक्के विद्यार्थी नापास (Fail) होत असल्याचे वास्तव आहे.
यातील नापास विद्यार्थ्यांना घरात बसून राहावं लागतं असल्याने पालकांच्या इच्छा आणि मुलांचं भविष्य अंधकारमय आहे. पालक आपले अपूर्ण स्वप्न मुलांत पाहत असल्याने अनेकदा मुलांच्या वाट्याला अपयश येत आहे. यासाठी मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी (Medical Eduication) परदेशी पाठवण्यापूर्वी स्वतः आणि मुलांची स्क्रिनिंग टेस्ट करणं आवश्यक आहे अशी माहिती रशियात (Russia) शिक्षण घेतलेले मधुमेह तज्ञ डॉ.चांद पटेल यांनी दिली आहे. परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अनेक सल्लागार संस्था कार्यरत आहेत ते पालकांच्या आर्थिक क्षमता पाहत सल्ला देत असतात. पण परदेशात जाऊन दुसऱ्या भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणे हे सोप्पं काम नसून अत्यंत कठीण आहे.
यासाठी मेहनत खूप घ्यावी लागते. अश्या संस्थानी दिलेल्या सल्ल्यानंतर पालकांनी वेबसाईटवर स्वतः याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचे आहे. अनेक पालक यात कमी पडत असल्याने परदेशात डॉक्टर झालेल्या मुलांना भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. यात निराशा पदरी आल्यास भविष्य अंधकारमय बनत अपेक्षाभंग होतो. सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine-War) अनेक विद्यार्थी भारतात परतले आहेत. त्यांना भारतीय वैद्यकीय शिक्षण प्रक्रियेत सामावून घेण्याची मागणी जोर धरली जात आहे. पण वास्तविकपणे असं होणं अशक्य आहे. इथं वैद्यकीय प्रवेश न मिळालेले अनेक विद्यार्थी आहेत. ते यावर हरकती घेण्याची शक्यता आहे.
भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे युक्रेनहून (Ukraine) परतलेले विद्यार्थी मानसिकदृष्ट्या देखील युद्धजन्य परिस्थितीत आहेत. काही काळानंतर परिस्थिती सामान्य होईल. हेच विद्यार्थी परदेशात जाऊन भविष्यात शिक्षण घेतीलही. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता काळ कठीण आहे. एकूणच काय तर परदेशी वैद्यकीय शिक्षण घेताना पालक आणि विद्यार्थी यांनी भविष्याचा सखोल अभ्यास करणे देखील गरजेचे आहे. यात पालकांचा पैसा आणि मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस वाया जाऊ नये.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.