शेअर मार्केटमध्ये तब्बल १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या तरुणाने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे जामगाव (ता. माढा) येथील खून आणि घरफोडी प्रकरणाच्या तपासात समोर आले आहे. गावातील एका कुटुंबीयांचे व्हॉट्सॲप स्टेटस पाहिल्यानंतर ते तिरुपती बालाजी येथे गेल्याचे दिसून आले. घरात कोणी नसल्याचे गृहीत धरून आरोपीने त्यांच्या घरात चोरी करण्याचा बेत आखला. मात्र, चोरी करताना घरमालक जागे झाल्याने आरोपीने त्यांचा हातोड्याने वार करून खून केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला कर्नाटकातील वाडी रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे.
अजयकुमार गौतम चव्हाण (वय ३१, रा. जामगाव, सध्या लऊळ, ता. माढा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २५ ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान जामगाव येथे हा प्रकार घडला होता. घरात घुसून अशोक भीमान्ना मुळे (वय ६१) यांच्या डोक्यात हातोड्याने गंभीर वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर लोखंडी कपाट उचकटून सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस नेण्यात आले होते.
गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी चार स्वतंत्र पथके तयार केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करताना मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान आरोपी अजय चव्हाण याच्यावर संशय बळावला. तो मागील काही काळापासून जामगाव येथे राहत नसून लऊळ येथे राहत होता. पोलिसांचा संशय आल्याचे लक्षात येताच त्याने मोबाईल बंद करून पलायन केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तो कर्नाटकातील कलबुर्गी परिसरात असल्याचे पोलिसांना समजले.
दरम्यान, आरोपी वाडी रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने वाडी रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला प्लॅटफॉर्मवरून ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले. शेअर मार्केटमध्ये १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याने तो आर्थिक अडचणीत व नैराश्यात होता. त्याच काळात गावातील संबंधित कुटुंबीयांचे व्हॉट्सॲप स्टेटस त्याने पाहिले. या स्टेटसवरून कुटुंबीय तिरुपती बालाजी येथे गेल्याचे त्याच्या लक्षात आले. घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन त्याने चोरी करण्याचा बेत आखला. चोरीची तयारी करताना घराच्या मागील बाजूच्या पाइपवरून चढून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कुलूप उघडण्यासाठी त्याने यूट्यूबवर पाहिलेल्या व्हिडिओतील पद्धतीचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. सिरिंजच्या साहाय्याने कुलूपात पेट्रोल टाकून ते पेटवून कुलूप उघडल्याचे आरोपीने सांगितले.
मात्र, घरातील कपाट उचकटत असताना अशोक मुळे जागे झाले. त्यांनी आरोपीला ओळखल्याने घाबरलेल्या आरोपीने त्यांच्यावर हातोड्याने डोक्यात वार केले. या हल्ल्यात अशोक मुळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने दागिने घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. आरोपीला माढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास माढा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.