महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला उजनी येथून पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा 267 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातील सुमारे 90 कोटींचा पहिला हप्ता पुढील दोन दिवसांत देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरणातून 170 दशलक्ष लिटर पाणी सोलापूर शहराला दररोज आणण्यासाठी 894 कोटींचा प्रकल्प मंजूर केलेला आहे. या अंतर्गत कामे सुरू आहेत. राज्य शासनाचा 267 कोटींचा हिस्सा लवकरच देण्यात येणार असून, त्यातील पहिला टप्पा सुमारे 90 कोटी पुढील दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील. तरी महापालिकेने या अनुषंगाने पुढील कामे त्वरित पूर्ण करून सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्याप्रमाणेच सोलापूर शहर महापालिकेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून जुना पुना नाका ते पत्रकार भवन व जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला असे दोन उड्डाणपूल मंजूर असून भूसंपादनासाठी 101 कोटींचा शासन हिस्साही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उजनी धरण पाणी पातळी कमी झाल्याने शहरातील लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दुबार व तिबार पंपिंग महापालिकेला करावे लागते, त्यासाठी आवश्यक असलेला 3.54 कोटीचा तर हुतात्मा स्मृती मंदिराच्या नूतनीकरणासाठी 3.36 कोटीचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. (Latest Marathi News)
यावर्षी पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत ज्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू आहेत त्यातून प्रत्येक गावात पाणीपुरवठा झाला पाहिजे यासाठी सांगोला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चांगल्या प्रकारे चालवली जात आहे, तरी याच धरतीवर जिल्ह्यातील सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना संबंधित यंत्रणांनी चालवल्या पाहिजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक गावात आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठा उपाययोजना कराव्यात. तसेच जनावरांना माहे जून 2024 अखेरपर्यंत चारा उपलब्ध होईल यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश देऊन बियाणे महामंडळाने टंचाई परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याला चारा बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी निर्देशित केले.
पंढरपूर देवस्थान आराखड्यातर्गंत 73 कोटींचा निधी मंजूर असून, या अंतर्गत पुरात्व विभाग काम करत असून माहे मार्च 2024 पर्यंत त्यांना आवश्यक असलेला पाच कोटीचा निधी त्वरित देण्यात येत आहे. या अंतर्गत कामे करत असताना पुरात्व विभागाने लोक भावना लक्षात घेऊन कामामध्ये वेगळेपणा व नाविन्यता आणावी. यासाठी उज्जैन अयोध्या व वाराणसी येथे जाऊन तेथील मंदिराचे केलेले नूतनीकरण कामाची पाहणी करून माहिती घ्यावी व त्या पद्धतीने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कशा पद्धतीने चांगल्या व दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.