सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वास आला असून येत्या शिवजयंतीच्या दिवशी (दिनांक १९ फेब्रुवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित असतील अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त जगदीश कदम यांनी आज शिवसृष्टी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अमृत पुरंदरे व शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार उपस्थित होते.
पद्म विभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे sयांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेल्या या शिवसृष्टी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती देतांना जगदीश कदम म्हणाले की, या टप्प्यामध्ये प्रामुख्याने एक भव्य स्वागत कक्ष, एखाद्या आधुनिक थीम पार्कला साजेल असे टाईम मशीन थिएटर व तुळजा भवानी मातेचे भव्य मंदिर यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक माणूस म्हणून कसे होते हे देखील लोकांपर्यंत पोहोचवायला हवे असे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न होते. त्यानुसार या टप्प्याची रचना करण्यात आली आहे. या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे रुपये ८७ कोटी इतकी गुंतवणूक करण्यात आली असून स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्वाची ३ तत्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.
या टप्प्याचे एक मुख्य आकर्षण म्हणजे विशेष असे टाइम मशीन थिएटर जे शिवप्रेमींना एक पर्वणीच ठरेल. यामध्ये आपण सुमारे १००० वर्ष मागे जातो व तिथून शिवाजी महाराजांच्या काळात येतो. वर नमूद केल्याप्रमाणे महाराजांना महत्वाची असणारी ३ तत्वे स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा याद्वारे ते लोकांशी कसे जोडले गेले होते यावर आधारित कथा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवप्रेमींना अनुभवता येणार आहेत. यामध्ये मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स व सर्वात महत्वाचे म्हणजे ३६० अंशामध्ये फिरणारे रोटेटिंग अर्थात फिरते थिएटर ज्यावर एका वेळी ११० व्यक्ती या विशेष अशा ३३ मिनिटांच्या शो’चा अनुभव घेऊ शकतील.
या दुसऱ्या टप्प्यातील भव्य स्वागतकक्षात ४ टप्प्यांमध्ये निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीची प्रतिकृती (मॉडेल) ठेवण्यात आले असून त्या त्या टप्प्याच्या नावासमोरील बटन दाबले असता तो टप्पा कशासंबंधी आहे व शिवसृष्टीत कुठे आहे हे शिवप्रेमींना कळू शकेल. या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ६ मोठे पोर्ट्रेट्स लावण्यात आले आहेत. या पोर्ट्रेट्सचे वैशिष्ट्य असे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या या प्रिंट्स आहेत. यामुळे छत्रपती कसे दिसत असतील याचा काहीसा अंदाज शिवप्रेमींना येऊ शकतो. यामध्ये द हेग नॅशनल आर्काईव्हज व नॅशनल लायब्ररी ऑफ नेदरलँड्स, रिक्स म्युझिअम अॅमस्टरडॅम, ब्रिटीश म्युझिअम लंडन, बिल्बीओथेक नॅशनल पॅरीस व छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई येथील पेंटिंग्जचा समावेश आहे.
लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी ख्याती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत खूप लढायांचे नेतृत्व केले. त्यातील आपल्याला फारशी माहिती नसलेल्या लढायांची माहिती येथे लिखित स्वरूपात मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये देण्यात आली आहे.
यामध्ये एप्रिल १६७४ मध्ये आदिलशहाच्या ताब्यात असलेला वाईजवळचा केंजळगड छापा मारून ताब्यात घेणे, ऑक्टोबर १६७० मध्ये सुरतेची लुट करून येत असताना मोगल सरदार इखलास खान यास मोकळ्या मैदानात हरवणे, ऑक्टोबर १६६४ मध्ये आदिलशाही सरदार बाजी घोरपडे यांना यमसदनी पाठवून शहाजीराजे यांचा पूर्वी झालेल्या अपमानाचा बदला घेणे, फेब्रुवारी १६६१ मध्ये करतलब खान कोंकण जिंकण्यासाठी तुंग किल्ल्याजवळून घाट उतरत असतांना गनिमी काव्याने हल्ला करून त्याला शरण येण्यासाठी भाग पडणे, डिसेंबर १६५९ मध्ये कोल्हापूर जवळ विजापूर सरदार रुस्तम ए जमा व अफजल खान याचा मुलगा फझल खान यांच्या वर हल्ला करून त्याच्या दारूण पराभव करणे व जानेवारी १६५६ साली कृतघ्न चंद्रराव मोऱ्यांवर स्वतः हल्ला चढवून जावळीचा परिसर जिंकणे आदी लढायांचा समावेश आहे.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजा भवानी मातेचे मंदिर या टप्प्यात साकारण्यात आले आहे व आता शिवसृष्टी पाहण्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना दर्शनासाठी खुले असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.