- तबरेज शेख
Nashik : एकलहरे रोड वरील शाळेचे बॅंच बनविणा-या कारखान्याचे संचालकाचे अपहरण झालं हाेतें. संबंधित संचालकाचा मालेगाव (malegoan) तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात मृतदेह मिळून आला. या घटनेने नाशिक शहरात (nashik) एकच खळबळ उडाली आहे. शिरीष गुलाबराव सोनवणे (वय ५६, राहणार के.जे.मेहता हायस्कुल नाशिकरोड) असे संबंधिताचे नाव असून नाशिकरोड पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
या घटनेबाबतची प्राथमिक माहिती अशी : एकलहरे रोड वरील स्वस्तीक फर्निचर या कारखान्यात शाळेत विद्यार्थ्यांसाठी लागणारे बेंच तयार केले जातात, या कारखान्याचे मालक शिरिष गुलाबराव सोनवणे शुक्रवारी (ता. ९) दुपारी साडे चारच्या सुमारास कारखान्यात असताना एका चार चाकीतून चालकासह तीन व्यक्तीपैकी एकाने कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख याला मालक सोनवणे यांना आॅर्डर द्यायची आहे असे सांगून गाडी जवळ बोलावण्यासाठी सांगितले. मात्र, फिरोज याने आपणच कारखान्यात चला असा आग्रह धरला असता गाडीतील व्यक्ती अपंग असून चालता येत नाही असे सांगत मालक सोनवणे यांना पेन व वही घेऊन गाडीत बोलवा असे सांगितल्यावर सोनवणे हे गाडीत बसले.
दरम्यान फिरोज यास चहा आणण्यासाठी सांगण्यात आले. चहा देऊन फिरोज हा कारखान्यात गेला, बराच वेळ गेल्यानतंर मालक कारखान्यात आले नाही परंतू सदर गाडी वळून सिन्नरफाटाच्या दिशेने जाताना कामगारांनी पाहिली. त्यानंतर सोनवणे यांच्या पत्नी उज्वला यांनी कारखान्यातील एका कामगाराला फोन करुन पती शिरीष यांचा फोन बंद येत असल्याचे सांगून विचारणा केली.
यावेळी कामगारांनी बाहेर पाहिले असता मालक सोनवणे दिसून आले नाही. या नंतर शोधाशोध झाल्यानंतर फिरोज याने शनिवारी (ता.१०) नाशिकरोड पोलीस ठाण्यात मालक सोनवणे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके रवाना करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे घोटी टोलनाका, शिंदे टोल नाका येथील सीसीटीव्ही फुटेज व फोन काॅल्सच्या आधारे तपास सुरु होता. तपास सुरु असतांना मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील पाटबंधारे कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह मिळून आल्याची माहिती मिळाली. तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक जयेश गांगुर्डे यांनी त्यांच्या नातेवाईकाकडून मृतदेहाची ओळख पटवून शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.