सरपंचाचे फिल्मी स्टाईल अपहरण.
ऊसतोड ठेकेदार आरोपी.
पोलिसांवर कडक कारवाईची मागणी.
पैसे वसूलीसाठी ऊसतोड ठेकेदारांनी थेट गावच्या सरपंचाचे अपहरण केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. हा संपूर्ण प्रकार नंदुरबारच्या सावऱ्यादिगर गावात घडली आहे. आदिवासी सरपंचाचं अगदी फिल्मी स्टाईलनं अपहरण करण्यात आले. ऊसतोड ठेकेदारांनी आपले अडकलेले पैसे काढण्यासाठी थेट सरपंचालाच लक्ष्य केलं. सरपंचाचे हातपाय बांधून आठशे किलोमीटर दूर नेत एका गोठ्यात डांबून ठेवलं. मात्र, धडगाव पोलीस आणि आदिवासी जनजागृती टीमच्या सतर्कतेमुळे अवघ्या २४ तासांत त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दिलीप पावरा असे सरपंचाचे नाव आहे. सांगलीच्या येडेनिपाणी येथील ऊसतोड ठेकेदार पोपट दिलीप शेवाळे, त्यांचे दोन भाऊ तसेच इतर ४ जणांनी मिळून सरपंचाचे अपहरण केले. ठेकेदारांचे धडगाव तालुक्यातील काही लोकांसोबत जुने आर्थिक व्यवहार होते. या व्यवहारातून अडकलेले पैसे काढण्यासाठी त्यांनी गावच्या सरपंचालाच ओलीस ठेवण्याचा क्रूर कट रचला.
धडगाव शहरातून आरोपींनी सरपंचाला फसवून गाडीत बसवले. गाडी सुरू झाल्यावर त्यांनी सरपंचावर जबरदस्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे दोन्ही हात मागे बांधून त्यांना मारहाण केली. गावकरी आणि कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सरपंच परिषद धडगावने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांवर तातडीने कारवाईचा दबाव टाकला. "जर २४ तासांच्या आत सरपंचाची सुटका झाली नाही, तर तीव्र आंदोलन करू," असा इशारा त्यांनी दिला. संतप्त ग्रामस्थांनी दोन दिवस पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता.
गावकऱ्यांचा रोष आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान, अपहरणकर्त्यांनी सरपंचाला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका गावात नेऊन एका गाईच्या गोठ्यात डांबल्याचे उघड झाले. माहिती मिळताच, धडगाव पोलिसांनी एका खास पथकाची स्थापना केली. या पथकाने आदिवासी जनजागृती टीम आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा मदतीने तातडीने सांगलीकडे धाव घेतली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि टीमच्या अचूक माहितीमुळे अवघ्या 24 तासांत त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि सरपंचाची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर धडगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी सरपंचाच्या अपहरणाचा तीव्र निषेध केला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्ष राहावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.