ठाकरेसेनेचे 6 खासदारांनी बंड केल्यानंतरही शिंदेसेनेचं ऑपरेशन टायगर थांबायला तयार नाही.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ऑपरेशन टायगर 3 आता थेट विधानपरिषदेत राबवलं गेलयं...ठाकरेंचे विश्वासू आणि वरळीतील विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी महायुतीकडून उपसभापतीपदाचा अर्ज दाखल करून ठाकरेंना धक्का दिलाय. त्यामुळे अहिरांच्या बंडानं आता आदित्य ठाकरेंपुढे मोठं आव्हान निर्माण होणार आहे...ते कसं पाहूयात....
सचिन अहिर हे वरळी विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2014 अशा तीन टर्म सलग 15 वर्ष आमदार राहिलेत... मुंबईतील, वरळी भागातील कामगार संघटनांमध्ये सचिन अहिर यांचा दबदबा आहे. पक्ष संघटनेत त्यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी सचिन अहिरांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आणि त्यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली. त्यानंतर तिकीट कापण्यात आलेल्या सुनील शिंदे यांचीही नाराजी दूर करण्यासाठी त्यांनाही विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ कमालीचा सुरक्षित झाला होता.
मात्र आता हेच सचिन अहिर पुढच्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंना आव्हान देणार की काय अशी चर्चा आता रंगू लागलीय. अहिरांच्या पक्षप्रवेशानं महायुतीची ताकद वरळी मतदारसंघात वाढणार हे निश्चित आहे... मात्र मतदारसंघाकडे पाहून आम्ही निर्णय घेत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरळीवरील वर्चस्वाचा मुद्दा सध्या बाजूला ठेवलाय...
तर दुसरीकडे आत्मपरिक्षण करायला हवं, असं म्हणत आमदार सुनील शिंदेंनी ठाकरेसेनेलाच घरचा आहेर दिलाय...त्यामुळे तेही नाराज आहेत की काय अशी चर्चा रंगलीय.
दोन आमदारांच्या सुरक्षा कवचात आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ आतापर्यंत सुरक्षित मानला जात होता. मात्र त्यातला एक बुरूज ढासळलाय. तर दुसऱ्या बुरूजाबाबत शंका कुशंका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काळात आदित्य ठाकरेंना वरळीतून विधानसभेवर जाणं अधिक आव्हानात्मक असणार एवढं नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.