Railway Police Officer death at Kasara Railway Station: मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकात दुर्दैवी घटना घडली. धावत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचा पडून मृत्यू झाला. दिलीप सोनावणे (वय ५६) असे त्यांचे नाव आहे.
रविवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. धावत्या एक्स्प्रेसमधून खाली पडून रेल्वे पोलीस अधिकारी (RPF) सोनावणे यांचा मृत्यू झाला. ते रात्रपाळीला आले होते. ट्रेनच्या डब्यांमध्ये ते पाहणी करत होते. कसारा रेल्वे स्थानकात एलटीटी कानपूर एक्स्प्रेस थांबली. ते रेल्वे स्थानकात उतरत होते, तोच काही प्रवाशांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यांची सोडवणूक करण्यासाठी ते पुन्हा ट्रेनमध्ये चढले.
प्रवाशांची तक्रार सोडवून ते धावत्या एक्स्प्रेसमधून स्थानकात उतरण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांचा तोल गेला आणि फलाट आणि ट्रेनच्या फूटबोर्डच्या मोकळ्या जागेत पडून ते चाकाखाली सापडले. यात त्यांचा मृत्यू झाला. दिलीप सोनावणे हे कल्याणमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.
त्यावेळी नेमकं काय घडलं?
सोनावणे यांनी धावत्या ट्रेनमधून कसारा रेल्वे स्थानकात उतरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाय मुरगळला आणि तोल गेला. काही कळण्याच्या आत ते फलाट आणि ट्रेनमधील मोकळ्या जागेतून पडले आणि चाकाखाली सापडले. फलाट आणि ट्रेनच्या फुटबोर्डमध्ये बरेच अंतर आहे. त्यातून ते खाली पडले आणि ही दुर्घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खूपच दुःख झालं. ते सर्वात चांगल्या आरपीएफ अधिकाऱ्यांपैकी एक होते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.