Maharashtra unseasonal Rain: राज्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, नाशिक, बीड, धुळे अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. नाशिकमध्ये जोरदार गारपीट झाली तर भीमाशंकरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह तुफान गारपिट झाली.
भिमाशंकर परिसरात तुफान गारपिट
भिमाशंकर परिसरातील अनेक गावांत सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊस आणि तुफान गारपिट झाली. आंबेगाव तालुक्यातील जांभोरी आसाणे, कुशिरे, अडिवरे येथील डोंगरकड्यावरच्या भागात अचानक वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने उन्हाळी बाजरीसह आंबा आणि जनावरांची खाद्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सर्वत्र पडलेल्या गारांच्या पाऊसामुळे डोंगरकड्यांवरील भागातील वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी हा पाऊस म्हणजे आजारपणाला निमंत्रणच असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे.
धुळ्यात सोसट्याच्या वाऱ्यासह गारपिट
धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात शेवगे, बल्हाने, निजामपूर परिसरामध्ये अवकाळी पाऊस झाला. या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसादरम्यान तुफान गारपीट देखील झाली. हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार सकाळपासून ढगाळ वातावरणासह संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाला झाली सुरुवात झाली. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या आणि शेतात काढून ठेवलेल्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अवकाळीमुळे लिंबनीच्या बागा उद्धवस्त
बीडच्या माजलगाव तालुक्यात अवकाळी पाउस आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे लिंबूनीच्या बागा आणि शेवग्याच्या झाडाचे प्रचंड नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र महसूल विभागाने अद्याप पंचनामे केले नाहीत. बीडच्या मोठेवाडी येथील दत्तात्रय गोले आणि रामभाऊ गोले या शेतकऱ्याने गेल्या पंधरा वर्षापासून जोपासलेली लिंबूनीची बाग वादळी वाऱ्याने उध्वस्त केली. त्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहे. त्यांच्याकडून तातडीने मदतीची मागणी केली जात आहे.
अहमदनगरमध्येही गारांचा पाऊस
अहमदनगर शहराला जोरदार गारांनी चांगलेच झोडपून काढले असून जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस यामुळेच नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आता रोजच हजारी लावत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते भर भरून वाहत होते. अवकाळी पावसाने झोडपण्याची ही आठवी वेळ असून यामुळे काही साथीचे रोग पसरले असून डॉक्टरांचे दवाखाने हाउसफुल झाले आहेत. (Unseasonal Heavy rain In Maharashtra)
नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
नाशिकमध्ये सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. शहराच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात आला आहे, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ. हवामान खात्याने अजून 2 दिवस पावसाचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
सिन्नर तालुक्यातील जोरदार गारपीट
सिन्नर तालुक्याला आज पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढलय. तालुक्यातील अनेक भागात एक ते दीड तास विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. सिन्नर शहरासह तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भाटवाडी, हरसुले, सोनांबे कोनांबे, डुबेरे, ठाणगाव, पाडळी, भुरवाडी या भागाला अवकाळी आणि गारपीटीचा सर्वाधिक तडाखा बसला.
आज पुन्हा आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे बळीराजावर पुन्हा मोठं संकट ओढवलं असून उभ्या पिकांत पुन्हा पाणी साचल्याने नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर प्रशासनाने करावी अशी मागणी होतेय. काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा पिकांचे द्राक्षे, टरबूज या पिकांचं गारपिटीमुळे मोठे नुकसान झालं. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.