रायगड जिल्ह्यातील साळाव-रेवदंडा पूल प्रकल्प वेगाने सुरू आहे
हा आधुनिक चारपदरी पूल अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यांना जोडणार
१५ ते २० टक्के काम पूर्ण झाले असून २०२८ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला
पुलामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार
रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा बहुप्रतीक्षित साळाव-रेवदंडा (कुंडलिका खाडी) पूलचे काम जलद गतीने सुरु आहे. सुमारे १,२५० कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अलिबाग, मुरुड आणि रोहा हे तीन प्रमुख तालुके जोडले जाणार असून, भविष्यातील वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.
रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील हा पूल सुमारे ३.८ किलोमीटर लांबीचा असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून त्याची उभारणी करण्यात येत आहे. प्रकल्पाचे बांधकाम अशोका बिल्डकॉन लिमिटेडकडून सुरू असून कुंडलिका खाडीच्या पात्रात अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पाइल फाउंडेशन आणि खांब उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत प्रकल्पाला मिळालेल्या गतीमुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
साळाव-रेवदंडा मार्गावरील पूल १९८६ मध्ये बांधण्यात आला होता. मात्र, गेल्या चार दशकांत वाहतुकीत झालेली मोठी वाढ आणि पुलाची जीर्ण अवस्था लक्षात घेता नवीन पुलाची गरज निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर शासनाने आधुनिक चारपदरी पुलाच्या उभारणीला मंजुरी दिली. सध्या प्रकल्पाचे सुमारे १५ ते २० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील दोन ते अडीच वर्षांत हा पूल पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
नवीन पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे तो आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. पुलावर ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहतूक करता येणार असून दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी फूटपाथची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय आकर्षक डेकोरेटिव्ह लाइटिंग, सुरक्षिततेसाठी इन्स्पेक्शन गॅलरी आणि देखभालीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग न राहता कोकणातील आधुनिक पायाभूत सुविधांचे प्रतीक ठरेल.
दरम्यान, नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने जुन्या पुलावर वाहतुकीवर निर्बंध कायम आहेत. केवळ पाच टनांपर्यंत वजन असलेल्या हलक्या वाहनांनाच पुलावरून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. एसटी बस, ट्रक आणि इतर अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. २०२८ च्या सुरुवातीला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अलिबाग, मुरुड, रोहा आणि दक्षिण रायगडातील अनेक भागांतील प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होणार आहे. पर्यटन, उद्योग, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कुंडलिका खाडीवर उभा राहत असलेला हा भव्य पूल रायगडच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.