भरत नागणे, पंढरपूर प्रतिनिधी
Laxman Hake demands arrest of Manoj Jarange before Mumbai protest : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर सडकून टीका करत, त्यांना मुंबईत येण्यापूर्वीच सरकारने तात्काळ अटक करावी, अशी थेट मागणी केली आहे.
शासन जरांगेंना रेड कार्पेट घालतंय का?
पत्रकार परिषदेत बोलताना हाके म्हणाले, दोन दिवसांपूर्वी आम्ही ओबीसी समाजाचा पायी मोर्चा काढत असताना शासनाने आम्हाला विनंती केली आणि थांबायला सांगितले. आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते असल्याने शासनाच्या शब्दाचा मान ठेवून थांबलो. आता शासन जरांगे पाटलांचे हे आंदोलन थांबवते की त्यांना पुन्हा रेड कार्पेट घालते, हेच आम्हाला पाहायचे आहे.
गणेशोत्सवात सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न
गणेशोत्सवाच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित करत हाके म्हणाले, गणेशोत्सवासारखा मोठा सण मुंबईत अत्यंत उत्साहात साजरा होतो. या काळात पोलिसांवर सुरक्षेचा आणि बंदोबस्ताचा मोठा ताण असतो. असे असताना व्यवस्थेला आणि सरकारला वेठीस धरण्यासाठीच आंदोलनाची वेळ गणेशोत्सवातच का निवडली जाते? सणाच्या काळात मुंबईकडे मोर्चा नेणे म्हणजे कायदा हातात घेण्याचाच प्रकार आहे.
बेकायदेशीर मागणीसाठी कायद्याचा बडगा दाखवा
पुण्यात एक पंडित नावाचा व्यक्ती मंत्र्यांबद्दल बोलला तर त्याला लगेच अटक होते, मग मनोज जरांगे यांना अटक का होऊ शकत नाही? असा सवाल त्यांनी केला. मुळात मागणीच बेकायदेशीर असेल आणि त्यावर कोणताही कायदेशीर तोडगा निघू शकत नसेल, तर शासनाने कायद्याचा बडगा दाखवलाच पाहिजे. जरांगेंना मुंबईत येण्याअगोदरच उचलून अटक केली पाहिजे, असे हाके म्हणाले.
EWS आणि SEBC चा आग्रह धरा; मुंबईऐवजी आता दिल्लीला जा
ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करताना हाके म्हणाले, "ओबीसींच्या आरक्षणात कुणीही घुसखोरी करू नये. मराठा समाजाने SEBC आणि EWS आरक्षणाचा आग्रह धरावा. संविधानात तरतूद नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनादुरुस्ती करून १० टक्के EWS आरक्षण दिले, ज्याचा कट-ऑफ ओबीसींपेक्षाही कमी आहे. मराठा समाजातील जाणकार आणि तज्ज्ञ मंडळींनी पुढे येऊन मनोज जरांगेंना ही बाब समजावून सांगितली पाहिजे. जरांगेंनी आता मुंबईला येण्यापेक्षा दिल्लीत जाऊन आंदोलन करावे, कारण मुंबईत आता त्यांचे ऐकायला कोणीही तयार नाही. मागील ११ आंदोलनांत मंत्री आणि आमदारांनी जे लाड पुरवले, ते इथून पुढे पुरवले जाणार नाहीत."
सलाईनवरून थेट संशय अन् अमृता फडणवीसांचा उल्लेख
जरांगेंच्या उपोषणावर संशय व्यक्त करत हाके म्हणाले, १२-१३ दिवस उपोषण केल्यानंतर या माणसाच्या शरीरात एवढी ताकद येते कुठून, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ते सलाईनमधून फक्त सलाईनच घेत होते की अजून काही घेत होते, हे एकदा तपासून पाहिले पाहिजे.
शेवटी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा समाजात कधीही वाद नव्हता, नेहमी निकोप स्पर्धा होती. आज राज्यातील वातावरण बिघडवण्यास केवळ मनोज जरांगे जबाबदार आहेत. त्यामुळे सरकारने आता अमृता फडणवीस यांच्या हस्ते जरांगेंची समजूत काढावी, अशी खोचक टोलेबाजीही त्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.