Black & White Interview Saam TV
महाराष्ट्र

Black & White : उद्धव ठाकरे, ऑपरेशन टायगर ते मराठी माणूस; १० प्रश्नांवर सचिन अहिरांची रोखठोक उत्तरे, Exclusive मुलाखत

Sachin Ahir Black and White interview : ब्लॅक अँड व्हाईटच्या विशेष मुलाखतीत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे, ऑपरेशन टायगर, मराठी माणूस, वरळीचे राजकारण, शिवसेना आणि महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांवर रोखठोक भूमिका मांडली. पाहा Exclusive मुलाखत

Namdeo Kumbhar

'राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो. राजकारण हे स्थलकाल सापेक्ष बदलणारे असते आणि त्यात सत्ता हीच सर्वोपरि असते,' याच मूळ संकल्पनेचा वेध घेत 'ब्लॅक अँड व्हाईट' (Black & White) या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार निलेश खरे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांची रोखठोक मुलाखत घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणि वैधानिक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सचिन अहिर यांनी या मुलाखतीत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

मातोश्री सोडण्याचा निर्णय आणि शिवसेना (UBT) नेत्यांचे आरोप

शिवसेना (ठाकरे गट) कडून करण्यात येणाऱ्या आरोपांवर उत्तर देताना सचिन अहिर म्हणाले, "२०१९ ला जर मी वरळीतून माघार घेण्याची भूमिका घेतली नसती, तर कदाचित आदित्य ठाकरे तिथून लढू शकले नसते. ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती मुख्य प्रवाहातील राजकारणात येत असताना त्यांना साथ देण्याचा निर्णय मी घेतला. त्यांनी मला विधान परिषदेवर पाठवले हे मी नाकारत नाही, पण दिलेल्या प्रत्येक जबाबदारीचे मी चीज केले आहे." त्यांनी ५२,००० मतांच्या फरकाने पक्षाचे उमेदवार निवडून आणल्याचा आणि कामगार संघटना थेट शिवसेनेशी जोडल्याचा दाखला दिला.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर मोठे भाष्य: "शिवसेना लगेच संपणार नाही पण..."

पक्षाच्या सद्यस्थितीवर बोलताना अहिर म्हणाले, "कोणताही पक्ष इतक्या सहज संपत नाही. मात्र, सध्या लोकांमध्ये तुलना होते आहे. एकनाथ शिंदे हे व्हिडिओ कॉलवर किंवा थेट सर्वसामान्यांना उपलब्ध असतात, तशी उपलब्धता दुसरीकडे आहे का? उद्धव ठाकरेंनी मध्यस्थांवर विसंबून न राहता थेट संघटनेशी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला पाहिजे. दुसरीकडे, श्रीकांत शिंदे हे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन तास-तास बसतात, हीच कार्यपद्धती बदलणे गरजेचे आहे."

"आमदारांमध्ये अस्वस्थता"; नवीन ऑपरेशन होणार का?

ठाकरे गटातील सद्यस्थितीवर सूचक वक्तव्य करताना अहिर यांनी मान्य केले की, तिथल्या आमदारांमध्ये अजूनही प्रचंड अस्वस्थता (Unrest) आहे. "तिथे नक्कीच अस्वस्थता आहे, कोणीही हे नाकारू शकत नाही. याचा अर्थ लगेच नवीन राजकीय ऑपरेशन (Operation 3.0) होईल असे नाही, पण जर आपल्याला कोणाशी टक्कर घ्यायची असेल, तर त्यांच्या तोडीस तोड काम करावे लागेल," असे ते म्हणाले.

वरळी मतदारसंघ आणि आदित्य ठाकरेंचे भविष्य

वरळीतून आदित्य ठाकरे आगामी काळात निवडून येऊ शकतील का, या प्रश्नावर अहिर म्हणाले, "वरळीवर कोणाचाही 'सातबारा' लिहिलेला नाही. हा मतदारसंघ अत्यंत व्हायब्रंट आहे. २०१४ च्या मोदी लाटेत मतदारांनी मलाही नाकारले होते. जेव्हा आम्ही एकत्र लढलो तेव्हा ८०-९० हजारांचे लीड मिळाले, पण आम्ही एकत्र असतानाही मिलिंद देवरांसमोर आमचे मताधिक्य अवघ्या ८ हजारांवर आले होते. हायराईज इमारतींमुळे इथली भौगोलिक आणि सामाजिक समीकरणे बदलत आहेत, त्यामुळे पुढचा निर्णय मतदारच ठरवतील."

आगामी निवडणुकीत वरळीतून उमेदवारी लढवणार का?

स्वतःच्या उमेदवारीबाबत त्यांनी मोठा निर्णय जाहीर केला. "मी आता वरळीपुरता संकुचित न राहता राज्यस्तरीय काम करण्याची भूमिका घेतली आहे. यापूर्वी मी राज्याचा नगरविकास आणि उद्योग राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला गल्लीतून थेट राज्याच्या मुख्य प्रवाहातील राजकारणात काम करायचे आहे. मी स्वतः लढेन किंवा इतर कोणी, पण माझ्या पक्षाचा आमदार निवडून आणणे ही माझी जबाबदारी असेल."

मुंबईतील आणि वरळीतील मराठी टक्का कसा वाचवणार?

वरळीतील गिरणी कामगारांचा इतिहास आणि बीडीडी चाळींच्या पुनर्विकासावर बोलताना माजी गृहनिर्माण मंत्री अहिर यांनी चिंता व्यक्त केली. "बीडीडी चाळींचे रिडेव्हलपमेंट आम्ही केले, पण अनेक लोक आर्थिक अडचणींमुळे घरे विकून जात आहेत किंवा भाड्याने राहत आहेत. जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. लोढा टॉवरसारख्या एका हायराईज इमारतीत आता एका नगरसेवका इतकी मते तयार झाली आहेत. मराठी माणूस टिकवण्यासाठी परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलली पाहिजे. सर्व खर्च वजा होऊन माणसाच्या 'सेव्हिंग'वर घर मिळाले पाहिजे, तरच मराठी टक्का टिकेल."

कामगारांचे प्रश्न आणि उपसभापती पदाचा वैधानिक वापर

"सभागृहात मी नसताना कामगार कायद्याचे बिल पास झाले होते, तेव्हा मी सभागृहाचे कामकाज थांबवून मंत्र्यांना शिष्टमंडळाची भेट घेण्यास भाग पाडले होते," अशी आठवण त्यांनी सांगितली. "आता उपसभापती या वैधानिक पदावर असताना, शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होते की नाही यावर माझा अंकुश असेल. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळवून देणे, जुन्या चाळी आणि असंघटित घटकांना न्याय देणे हीच माझी मुख्य भूमिका असेल."

१९९९ चे 'मातोश्री क्लब' नाट्य आणि विलासराव देशमुखांचे सरकार

विलासराव देशमुखांचे सरकार पाडण्याच्या नारायण राणेंच्या प्रयत्नांना अपयशी ठरवणाऱ्या रात्रीचा रंजक किस्सा सचिन अहिर यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितला.

"मला रात्री समीर भुजबळ यांचा फोन आला आणि छगन भुजवळ साहेबांनी रामटेक बंगल्यावर बोलावले. तिथे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. त्यांनी सांगितले की आपले काही आमदार पवईच्या 'मातोश्री क्लब'वर डांबून ठेवले आहेत, त्यांना सोडवून आणायचे आहे. मी तरुण आमदार होतो, परिस्थिती गंभीर वाटल्याने मी सोबत माझी परवानाधारक रिव्हॉल्व्हर घेतली. आम्ही तिथे गेलो, तिथे विरोधी पक्षनेते नारायण राणे आणि त्यांचे लोक होते. आम्ही दरवाजा ठोकून आमदारांना बाहेर काढत होतो, तेव्हा राणे साहेब वरून ओरडले- 'हरामखोरांनो, एका एकाला बघून घेईन.' ते ऐकताच पोलीस अधिकारी तिथून बाजूला झाले. मी आणि जितेंद्र आव्हाड यांनी कसाबसा पद्माकर वळवी आणि इतर आमदारांना ताब्यात घेतले आणि तिथून रिक्षाने सुरक्षित बाहेर काढले. त्या रात्री आम्ही सरकार टिकवले आणि ते पुढील ५ वर्षे चालले."

अरुण गवळी (डॅडी) यांच्याशी असलेले नाते

अरुण गवळी यांच्याशी असलेल्या संबंधांवर त्यांनी स्पष्टपणे सांगितले, "ते माझे सख्खे मामा आहेत आणि हे नाते मी कधीच लपवले नाही. पण त्यांच्या वलयाचा किंवा गुन्हेगारी जगताचा स्पर्श मी माझ्या राजकारणाला कधीही होऊ दिला नाही. १९९९ ला तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माझ्याविरुद्ध दोन सभा घेतल्या, पण माझ्यावर एकही आरोप केला नाही. इतकेच काय, जर मी त्यांच्या वलयाचा वापर करायचा ठरवला असता, तर मी स्वतः माझ्या मामांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली नसती, ज्यात मला १ लाख १० हजार मते मिळाली होती."

उपसभापती झाल्यानंतर शरद पवारांचा तो 'खास' फोन

"उपसभापती पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार साहेबांचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी स्वतःहून संपर्क साधला. फोनवर बोलताना काही गोष्टी स्पष्ट ऐकू न आल्याने मी फोन स्पीकरवर टाकला होता, त्याचा व्हिडिओ कोणीतरी काढला. मी लवकरच त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहे," असे सांगत अहिर यांनी पवारांविषयीचा आदर व्यक्त केला.

"उपसभापती हे अत्यंत महत्त्वाचे संवैधानिक पद आहे. या आसनावरून दिलेले निर्देश मुख्यमंत्र्यांनाही बंधनकारक असतात. विरोधी पक्षनेत्याच्या अगदी शेजारी हे आसन असते. सभागृहात दर्जेदार चर्चा घडवून आणणे, जे अयोग्य आहे ते रोखणे आणि सर्व सदस्यांना समान न्याय देणे हीच माझी प्राथमिकता असेल," असा विश्वास सचिन अहिर यांनी शेवटी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात मिळणारी फोडशीची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Healthy Bhakri : गहू, ज्वारी की बाजरी? 'या' १ पिठाची भाकरी आरोग्यासाठी आहे सर्वात नंबर वन

Maharashtra News Live Update: ग्राहकाला बुरशीयुक्त पिझ्झा बेस दिल्याप्रकरणी बदलापुरात FDAची कारवाई

Skin Care: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतायत? मग महागड्या ट्रिटमेंटपेक्षा घरीच तयार करा 'हा' फेसपॅच

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी मोठा खुलासा; 34 बोगस शिक्षक, प्रत्येकी ४,५०,००० ची ‘सेटिंग’

SCROLL FOR NEXT