Bharat Jadhav
कामासाठी तासनतास एकाच जागी बसून राहणे, जंक फूडचे सेवन, वजन वाढणे, तणाव, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांमुळे लोक कमी वयातच मधुमेहाच्या विळख्यात अडकत आहेत.
सर्वात चिंतेची बाब म्हणजे अनेक लोकांमध्ये बराच काळ कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे वैद्यकीय चाचणी होईपर्यंत हा आजार अनेकदा लक्षातच येत नाही.
यामुळे रक्तातील साखरेची वेळोवेळी तपासणी करणे, संतुलित आहार घेणे आणि दररोज थोडा वेळ योगासने किंवा व्यायाम करणे. हे या आजाराला प्रतिबंध करण्याचे सर्वात सोपे आणि प्रभावी उपाय मानले जातात.
मधुमेह हा आता केवळ वृद्ध व्यक्तींना होणारा आजार राहिलेला नाही. आधी असे मानले जात असायचं की कमी वयात होणारा मधुमेह हा वेगळ्या प्रकारचा असतो, परंतु आता ३० वर्षांच्या तरुणांमध्येही 'सामान्य' मधुमेह दिसून येत आहे.
डॉ. निशांत रायजादा सांगतात की, सुमारे ५० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. चाचणी केल्यानंतरच त्यांना रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे समजते. परंतु बहुतेकांना कोणतीही तक्रार किंवा समस्या जाणवत नाही. त्यामुळे केवळ लक्षणे दिसण्याची वाट पाहण्याऐवजी नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी.
डॉ. निशांत रायजादा सांगतात की, मधुमेहाची लक्षणे असलेल्या व्यक्तींना अति भूक लागणे, वारंवार तहान लागणे, वारंवार लघवीला होणे, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे आणि सतत अंगदुखी होणे यांसारखे त्रास जाणवू शकतात.
रक्तातील साखरेची तपासणी उपाशी पोटी आणि जेवणानंतर, अशा दोन्ही वेळी केली जाते. यासह 'HbA1c' ही चाचणी देखील केली जाते. ते गेल्या तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी दर्शवते.