महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला बदल करायचा आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र वेगळं होतं. 400 पारचा नारा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचा पाप पंतप्रधान मोदींच्या मनात होतं, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
जळगावच्या जामनेरमध्ये दिलीप खोपडे यांच्या प्रचार सभेचं सोमवारी (दि.११) आयोजन करण्यात आलं होत. यावेळी शरद पवार बोलत होते. संविधानावर हल्ला करण्याचं सूत्र या मोदी सरकारचा होतं. पाच वर्षांमध्ये माझे केवळ पाच खासदार होते. यावेळी 48 पैकी 31 जागा तुम्ही निवडून दिल्यामुळे घटनादुरुस्ती करण्याचं पाप मोदींना करता आलं नाही, असंही पवार यांनी यावेळी म्हंटलं आहे.
आपल्या भाषणातून महायुती सरकार आणि भाजपवर शरद पवार यांनी टीका केली. यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, 'मोदींच्या मनात असलेली घटनादुरुस्ती त्यांना करता येऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी इंडिया आघाडी तयार केली. घटना बदल करता येऊ नये म्हणून वाटेल ते करायचा निश्चय आम्ही केला, असंही पवार यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'खानदेशात कापूस पिकत असताना या लोकांनी परदेशातून कापूस आणण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना फसवण्याचं काम सरकारमधल्या नेत्यांनी केलं आहे. कार्यकर्ता काम घेऊन गेला तर त्याला दम दिला जातो. मात्र, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात, याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला असल्याचं म्हणत जामनेरमध्ये अजून एक सुद्धा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यासाठी ज्यांच्या जमीन घेतल्या होत्या त्यांना त्याची किंमतसुद्धा अजून मिळालेली नाही.' असा आरोप पवारांनी केला आहे.
दरम्यान, चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांना सोबत घेत सरकार स्थापन करून त्यांनी काय केलं? कोणते निर्णय घेतले? देशातल्या शेतकऱ्यांची, देशातील तरुणांची काय अवस्था आहे? असा प्रश्न उपस्थित करत एका वर्षात 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आहे, जो माल पिकवतो त्यालाच त्याच्या उत्पादनानुसार मोबदला दिला जात नाही आहे, अशी टीका पवारांनी केंद्र सरकारवर केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.