Mumbai News : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या रुपाने नवा मित्र सामील झाला आहे. नव्या मित्राच्या येण्याने शिवसेना आमदार नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आता ही नाराजी उघडपणे दिसू लागली आहे. मंत्रिपदावरुन युतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी आमदार अदिती तटकरे यांच्यावर टीका केली. या टिकेला आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे.
महिला आणि पुरुष थोडा तर फरक असतो ना, असं म्हणत भरत गोगावले यांनी अदिती तटकरेंना हिणवलं होतं. यावर अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'भरतशेठ तुम्ही नादच केलाय थेट! पालकमंत्रिपदासाठी आपले हपापणे आपल्या स्वभावाला साजेसे आहेच मात्र स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक आहे हे तुमचे उद्गार स्त्रीशक्तीला कमीपणा दाखवणारे आहेत. रायगडच्या मातीचे महत्व तुम्हाला यानिमित्ताने काही दिवसातच कळेल. तथास्तु..' (Latest Marathi News)
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रिपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे.
भरतजी आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो. जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं आपण त्या रायगडमधून येता, जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना 'सखी राज्ञी जयती' असा सन्मान करून अनुपस्थित राज्यकारभार करण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी. आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. (Breaking Marathi News)
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विधानाने केवळ आदितीताई तटकरे यांचाच अपमान झाला नाही, तर राज्यातील ६ कोटीपेक्षा अधिक महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय. स्री-पुरुष असा भेदभाव करणाऱ्या अधोगामी प्रवृत्तींचा जाहीर निषेध!
पवार साहेबांनी महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रात समान स्थान आणि समान सधी दिली. याचा नेहमीच अभिमान वाटतो, पण समानतेची शिकवण देणाऱ्या, संताची भूमी असलेल्या आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात महिला लोकप्रतिनिधींविषयी असं बेताल वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला.
रायगडच्या पालकमंत्रपिदाबाबत गोगावले यांना विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही त्यांच्यापेक्षा (अदिती तटकरे) चांगलं काम करु. महिला आणि पुरुष थोडा तर फरक येतोच ना. मला आमदारकीचा १५ वर्षांचा अनुभव आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सहाच्या सहा आमदारांची एकच मागणी आहे, रायगडचा पालकमंत्री, भरतशेठ'. भरत गोगावलेच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.