

वाढतं शहरीकरण, वाढलेलं ट्रॅफिक, सुरू असलेली नवी बांधकामं आणि उत्सवांच्या काळात होणारा मोठा आवाज यामुळे पुण्यासारख्या शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण हे आता रोजच्या आयुष्याचा भाग बनलंय. मात्र या सततच्या आवाजाचा कानांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. वाहतुकीदरम्यान सतत वाजणारे हॉर्न, लाऊडस्पीकर, फटाके आणि बांधकामावेळी होणाऱ्या तीव्र आवाजाच्या संपर्कात जास्त काळ राहिल्याने हळूहळू श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, ऐकण्याची क्षमता कमी होण्याची प्रक्रिया अनेकदा हळूहळू घडत असल्यामुळे सुरुवातीचे संकेत अनेकांच्या लक्षातही येत नाहीत. मोठ्या आवाजाचा सातत्याने होणारा परिणाम कानाच्या आतील नाजूक पेशींवर होतो. या पेशी आवाज स्पष्टपणे ऐकण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र वारंवार तीव्र आवाजाच्या संपर्कात आल्यास या पेशींना हानी पोहोचू शकते आणि त्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील ईएनटी तज्ज्ञ डॉ. अभिजित मंत्री यांनी सांगितलं की, वाहतुकीमधील गोंगाट, बांधकामासाठी वापरली जाणाऱ्या गोष्टी तसंच उत्सव किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे लाऊडस्पीकर आणि फटाक्यांचा आवाज यामुळे लोकांना कानांच्या सहनक्षमतेपेक्षा जास्त आवाजाचा सामना करावा लागतो.
दीर्घकाळ अशा आवाजाच्या वातावरणात राहिल्यास श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. इतकंच नाही तर ऐकण्याची क्षमता कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अनेकदा श्रवणशक्ती अचानक कमी होत नाही तर ती हळूहळू कमी होत जाते. अलीकडच्या काळात श्रवण समस्यांमुळे उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सुमारे ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचंही, डॉ मंत्री यांनी सांगितलं.
२५ ते ७९ वयोगटातील अनेकांना गर्दीच्या ठिकाणी बोललें स्पष्ट ऐकू न येणं, लोकांनी सांगितलेली गोष्ट पुन्हा विचारावी लागणं, टीव्ही किंवा मोबाईलचा आवाज नेहमीपेक्षा जास्त ठेवावा लागणं, कानात सतत काहीतरी वाजल्यासारखा आवाज येणं किंवा समोरची व्यक्ती स्पष्ट बोलत नाही असं वाटणं ही अशी लक्षणं जाणवतात. ही लक्षणं दुर्लक्षित केल्यास उपचार उशिरा सुरू होतात आणि समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता वाढते.
डॉ. मंत्री यांनी सांगितलं की, ऐकण्याशी संबंधित समस्या ओळखण्यासाठी ईएनटी तज्ज्ञ किंवा ऑडिओलॉजिस्टकडून केली जाणारी ऑडिओमेट्रीसारखी साधी चाचणी उपयुक्त ठरते. वेळेवर तपासणी केल्यास श्रवणशक्ती कमी होण्याचा प्रकार आणि त्याची तीव्रता ओळखणं सोपं होतं. परिस्थितीनुसार उपचारांमध्ये कानातील संसर्गासाठी औषधं, श्रवणयंत्रांचा वापर, स्टिरॉइड थेरपी किंवा इतर सहाय्यक उपचारांचा समावेश असू शकतो.
उत्सव किंवा कार्यक्रमांदरम्यान लाऊडस्पीकरच्या अगदी जवळ उभं राहणं टाळावं.
अत्यंत गोंगाटाच्या ठिकाणी इअरप्लग किंवा नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्स वापरावेत.
हेडफोन्स किंवा इतर म्युसिक सिस्टिमचा आवाज सुरक्षित लेवलवर ठेवावा.
सतत आवाज असलेल्या वातावरणात राहण्याऐवजी मधूनमधून शांत ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेणंही महत्त्वाचं ठरतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.