तळोदा (नंदुरबार) : पावसाळ्यात नदीला पूर येणे सामान्य बाब आहे. मात्र शनिवारी आश्चर्यकारक घटना घडली. त्यातून चक्क तप्त उन्हाळ्यात नदीला पूर आला. रापापूर (ता. तळोदा) येथे व परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे येथील नदीला पूर येत नदी प्रवाहित झाल्याचे दिसून आले. तसेच तालुक्यातील रामपूर व शिर्वे येथे गारपीट, तर अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Maharashtra News)
तळोदा (taloda) तालुक्यात सध्या तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस आहे. काहीवेळा तो पुढेदेखील गेला आहे. त्यामुळे तळोदा तालुक्यातील नागरिक हैराण असून त्यांना हा कडाक्याच्या उन्हाळा शारीरिकदृष्ट्या खूपच त्रासदायक ठरत आहे. भरदुपारी ऊन असह्य होत असल्याने नागरिक घरातच थांबण्यात धन्यता मानत असून, अगदी महत्त्वाचे (Nandurbar) काम असेल तरच घराबाहेर पडत आहेत. शनिवारी (ता. २२) तळोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात रापापूर (ता. तळोदा) व परिसरातदेखील दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे मात्र येथील नदीला पूर येत नदी दुथडी वाहत होती.
पूर पाहण्यासाठी गर्दी
पावसाळ्यात नदीला पूर येणे ही सामान्य बाब आहे. मात्र चक्क तप्त उन्हाळ्यात रापापूर नदीला पूर आल्याने परिसरातील नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच यासंबंधीचे व्हिडिओ काढून ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले. तळोदा तालुक्यातील रामपूर व शिर्वे येथे गारपीट झाली असून, अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक लहान-मोठ्या नद्या, नाले प्रवाहित झाले आहेत. अगोदरच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नसताना, शनिवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी पार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील अनेक गावांना फटका
शनिवारी झालेल्या अवकाळी व वादळी पावसाने तालुक्यातील लक्कडकोट (आंबागव्हाण), रोझवा, खर्डे बुद्रुक, केलवापाणी, रापापूर, कोठार, चौगाव, तोलाचापड, कुयलीडाबर, पाल्हाबार, जांबई, मोदलपाडा आदी गावांना चांगलेच झोडपले आहे. यामुळे मंडप करून ठेवलेला सुका चारा भिजला, तर शिल्लक असलेले आंबे झाडावरून गळून पडले. अनेक नागरिकांचे घरांचे पत्रे उडाले आहेत, तर अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली.