सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सातत्याने बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात बिबट्यानी केलेल्या हल्ल्यात ९ जणांचा बळी गेला आहे. त्यात तीन महिला आणि तब्बल सहा बालकांचा समावेश आहे. दरम्यान याच कालावधीत तळोदा तालुक्यात ९ बिबटे पिंजराबंद केले गेले, तरी आजही ३५ पेक्षा अधिक बिबटे या भागात वावरत असल्याची माहिती आहे. गुजरातच्या वन विभागाकडून चोरून लपून महाराष्ट्र हद्दीत बिबटे सोडले जात असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुका हा सातपुडा पर्वत रांगेत वसलेला आहे. तळोदा तालुक्याला मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमा लागून आहेत. या भागांमध्ये आदिवासी बांधव बागायती शेती करतात. विशेषतः केळी आणि उसाचे उत्पादन या ठिकाणी योग्यरीत्या घेतले जात आहे. मात्र हीच बागायती शेती आता आदिवासी बांधवांच्या जीवावर उठले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सातपुड्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे जंगलातल्या हिंस प्राण्यांना निवारा राहिला नाही. त्यामुळे बिबट्यांसारखे प्राणी ऊस आणि केळीच्या शेतात आसरा घेत असतात. यातून बिबटे शेतमजुरांवर आणि तिथल्या आदिवासी बांधवांवर हल्ले करत असल्याचा प्रकार सध्या वाढत चालला आहे.
येथील नागरिक सांगतात..
तळोदा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या चीनोदा गावात बिबट्याचा हल्ल्यात एका ९ वर्षीय प्रफुल पाडवी याचा मृत्यू झाला होता. मृत प्रफुलचे आजोबा पुना पाडवी सांगतात की प्रफुल्ल माझ्यासोबत शेतात काम करत असतानाच बिबट्याने त्याला उचलून नेलं आणि त्याचा मृत्यू झाला. आमच्या भागात अचानकपणे बिबट्यांचा वावर वाढला. नेमके हे बिबटे येतात कुठून हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला, तर गुजरातचे वन अधिकारी बिबटे महाराष्ट्राचा हद्दीत सोडत असल्याच्या अंदाज आहे.
जेरबंद केलेले बिबटे पुन्हा येथेच सोडतात
तळोदा तालुक्यातील पायथ्याशी असलेलं गाव रेवा नगर या भागात बिबट्याचा हल्ल्यात तीन बालकांना जीव गमवावा लागला आहे. वन विभागाला सूचना देऊनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. हल्ला झाल्यानंतर वन विभाग बिबट्या जेलबंद करतात. मात्र हेच जेरबंद केलेले बिबटे पुन्हा याच भागात सोडले जातात, असा आरोप रेवानगरचे गावकरी दाज्या पावरा यांनी केला आहे. कोणत्याही प्रकारची गणना वनविभाग करत नाहीत. नेमकी किती बिबटे आहेत याची माहिती वनविभागाकडे मिळत नाही. याउलट जे बिबटे जेरबंद केले जातात ते नेमके कुठे सोडण्यात येतात याची माहिती देखील वन विभाग गावकऱ्यांना देत नाही.
शिकार समजून बालकांवर हल्ले
जळगावचे वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई म्हणतात की सातपुड्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने वन्य प्राणी शेतीकडे वळले आहेत. शेतात ते निवारा करून राहत असल्याचे परिस्थिती आहे. तळोदा आणि शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती असल्याने बिबटे शेतात राहतात. बिबटे लहान मुलांना शिकार समजून हल्ले करतात. तर काही वेळा बिबटे हे संरक्षणासाठी हल्ला करत असल्याची बाब समोर आली आहे.
सातपुड्यात बिबट्यांचे वाढलेले हल्ले आणि गुजरात राज्यातील बिबटे महाराष्ट्रात सोडत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केल्यानंतर या संदर्भातील नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेटी यांना विचारले असता त्यांनी गुजरातचे बिबटे महाराष्ट्रात सोडत असल्याचा कुठलाही ठोस पुरावा नाही. मात्र बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करत असून बिबट्यांचे थर्मल मॅपिंग सध्या सुरू आहे. ज्या भागांमध्ये बिबट्यांचा वावर जास्त आहे; त्या ठिकाणी गावातील तरुणांना एकत्र करून फास्ट रिस्पॉन्स टीम तयार करत आहोत. जेणेकरून या टीमचा माध्यमातून मदत होईल अशी माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेटी यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.