नागपूर शहर परिसरातील जापानी गार्डन रोडवर आज सकाळी एका भरधाव अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. रस्त्यावर गाड्यांची शर्यत (रॅश ड्रायव्हिंग) लावणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे एका ज्येष्ठाच्या जीवावर बेतले आहे. तीन भरधाव कारपैकी एका अनियंत्रित टॅक्सी इनोव्हा कारने मॉर्निंग वॉक करत असलेल्या वृद्ध व्यक्तीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कैलास सनोडिया या ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी जापानी गार्डन रोडवर तीन चारचाकी गाड्या अत्यंत वेगात धावत होत्या. या गाड्यांमध्ये आपापसात रेसिंग सुरू असण्याची तीव्र शक्यता प्रत्यक्षदर्शींकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, वेगावरील नियंत्रण सुटल्याने एक टॅक्सी नंबर असलेली इनोव्हा कार आधी रस्त्यावरून जाणाऱ्या कैलास सनोडिया यांना चिरडत थेट गार्डनच्या भिंतीवर जाऊन जोरात आदळली.
धडक इतकी जोरदार होती की, सनोडिया यांचा जागीच प्राण गेला, तर कारच्या पुढील भागाचा पार चुराडा झाला. अपघातानंतर शर्यतीत असलेल्या उर्वरित दोन गाड्या चालकांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
चालक दारूच्या नशेत असण्याची शक्यता
घटना घडताच स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त कारमध्ये एक व्यक्ती अडकून पडला होता, तर पोलिसांनी गाडीतील दोघांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कारमधील तरुण दारूच्या नशेत असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, पोलीस त्यांची वैद्यकीय तपासणी करत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पळून गेलेल्या इतर दोन गाड्यांचा आणि त्यांच्या चालकांचा शोध घेण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जापानी गार्डन परिसरात अशा प्रकारच्या जीवघेण्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.