मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्काराने गौरविण्यात आलं. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विधिमंडळात अभ्यासपूर्ण विषयांची माडंणी, त्याचबरोबर मराठवाड्यातील विविध प्रश्न समस्यांकडे विधिमंडळाचे लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी सतत्याने प्रयत्न केल्याने सन २०१९-२० करिता उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराकरिता त्यांची निवड झाली आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आमदार सतीश चव्हाण यांना विधान परिषदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन २०१९-२० करिता मुंबई येथे विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार सतीश चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार मिळाल्यानंतर आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, ''राज्याचे विधिमंडळ हे जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे सर्वोच्च स्थान आहे. अशा सार्वभौम सभागृहात आपण मला सातत्यपूर्ण कार्य करण्याची संधी दिली म्हणून मी जनतेचा'आवाज होण्याचा प्रयत्न केला. आज त्याचा हा सन्मान आहे. हा पुरस्कार माझाच नाही, तर माझ्या मराठवाड्यातील जनतेचा सन्मान आहे, असे मी समजतो.''
याच कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, विधान परिषद सभागृहाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक दिशादर्शक नियम, कायदे यांची निर्मिती केली आहे. जे पुढे देशपातळीवर स्वीकारण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वि.स.पागे यांनी दिलेला रोजगार हमी योजनेसारखा लोकोपयुक्त कायदा ही याच विधीमंडळाची देण आहे. देशाच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष ग.वा.मावळणकर हे याच विधान परिषदेचे सदस्य होते तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटीलही याच विधीमंडळाच्या सदस्य राहिलेल्या आहेत.
विविध महत्वपूर्ण निर्णय, कायदे करण्यासोबतच लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे विधीमंडळ काम करत आहे. या माध्यमातून जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावत देशाच्या संसदीय प्रणालीत महाराष्ट्र विधीमंडळाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे सांगून विधान परिषदेच्या शतकपूर्तीच्या वाटचालीचा आढावा घेणारा संदर्भ ग्रंथ प्रकाशित केल्याबदद्ल तसेच या ग्रंथात तत्कालीन बॉम्बे विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती श्रीमती जेठी सिपाहीमलानी यांच्यावर सविस्तर माहिती देणारे प्रकरण ठेवल्या बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.