४०० कोटींच्या कंटेनर लुटीचा मास्टरमाइंडला अटक
किशोर सावला नाशिक पोलिसांसमोर शरण आला
या गुन्ह्याचा उलगडा अपहरण प्रकरणातून झाला होता
एसआयटी तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला
कर्नाटकातील चोरला घाट परिसरात 400 कोटी रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनरच्या लुटीप्रकरणातील मास्टरमाइंडला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि सूत्रधार किशोर सावला अखेर शनिवारी नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला. त्यामुळे यापूर्वी अटकेत असलेल्या सहा आरोपींसह आता या गुन्ह्याची संपूर्ण साखळी उलगडण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा एसआयटीचा तपास निर्णायक टप्प्यावर आला आहे.
१६ ऑक्टोबरच्या रात्री कर्नाटकात घडलेली ही लूटीची घटना घोटी- नाशिक मार्गावर झालेल्या संदीप पाटील यांच्या अपहरणातून उघडकीस आली होती. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात संदीप पाटील यांनी तक्रार दाखल करत फोन रेकॉर्डिंगसह सविस्तर माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर ९ जानेवारी रोजी घोटी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते.
सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मच्छिंद्र मढवी याची आरोपी म्हणून भर पडली. अलीकडील सुनावणीत विराट गांधी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून मढवी यांची पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे. तपासातील विविध वळणांमुळे किशोर सावला लवकरच पोलिसांसमोर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. काही पोलिस पथके त्याच्या शोधात अपयशी ठरली असतानाच किशोर सावळाने स्वतःहून पोलिसांसमोर शरण येत तपासाला नवे वळण दिले आहे. संपूर्ण घटना कर्नाटकात घडली असली, तरी नाशिकमधील अपहरण प्रकरणातूनच हा गुन्हा उघडकीस आल्याने कर्नाटक गृह खात्याचेही या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.
यापूर्वी कर्नाटक पोलिस अधिकाऱ्यांना अपेक्षित कागदपत्रे न मिळाल्याची चर्चा होती. मात्र आता मुख्य संशयित ताब्यात आल्याने अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असून एसआयटी प्रमुखांशी वरिष्ठ पातळीवर सातत्याने चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. कर्नाटकच्या राजकीय आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरलेल्या या प्रकरणात आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.