मराठवाड्यातील नागरिकांचे पाण्यामुळे टेन्शन वाढले आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस झाला नाही त्यामुळे अनेक प्रकल्प कोरडेठाक आहेत. काही प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यातील धरण प्रकल्पांमध्ये जमा झालेला पाणीसाठा हा फक्त ३३ टक्क्यांवर आहे. त्यामुळे वर्षभरासाठीची मराठवाड्याची पाण्याबाबतची चिंता वाढली आहे. मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये किती टक्के पाणीसाठा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत...
यंदाच्या पावसाळ्यातल्या अडीच महिन्यात मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील ७५ पैकी ३७ प्रकल्प अजुनही कोरडेच आहेत. कुठे मध्यम तर कुठे हलका पाऊस पडल्याने पिके जोमात आहेत. मात्र मराठवाड्यातील सर्वच मोठ्या, लघु आणि मध्यम प्रकल्पात एकत्रित सरासरी फक्त ३३ टक्के पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला. याकाळात मराठवाड्यात सर्वदूर धो-धो पाऊस बरसला नाही.
यावेळी सर्वाधिक वाईट परिस्थिती मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आहे. संभाजीनगरमधील १६ मध्यम प्रकल्प असून १३ धरणे पाण्याअभावी कोरडी आहेत. मागच्या वर्षी या प्रकल्पांमध्ये सुमारे ७६ टक्के पाणीसाठा होता. आजघडीला संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडीत ३१.११ टक्के साठा आहे. जालन्यातील आठ प्रकल्प शून्यावर आहेत. बीड जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पापैकी ८ धरणांमध्ये पाण्याचा थेंबही नाही.
लातूर जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये देखील खूपच कमी पाणीसाठा आहे. लातूर जिल्ह्यात ८ मध्यम प्रकल्प असून त्यात सरासरी २५ टक्के पाणी आहे. गतवर्षी ९ टक्के पाणी होते. धाराशिव जिल्ह्यात १७ मध्यम प्रकल्प असून यात ३१ टक्के पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही बऱ्यापैकी पाऊस पडल्याने धरणात सुमारे ८३ टक्के पाणीसाठा आहे. परभणी जिल्ह्यात दोन मध्यम प्रकल्प असून यात सरासरी ६९ टक्के पाणीसाठा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.