मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरंगे पाटील यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. उपोषण तसेच दौऱ्यांमुळे डॉक्टरांनी गेल्यावेळी त्यांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. अशात आपला पाचव्या टप्प्यातील दौरा कार्यक्रम आटपून जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगर येथे उपचार घेण्यासाठी रवाना झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मागील काही दिवसांपासून नियमित दौरा सुरू असल्याने जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली आहे. त्यांना कफ, अशक्तपणा आणि बरगड्यांचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. प्रकृती सुधारल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पुढील दिशेची तयारी करणार आहेत.
आरक्षणासाठी संयम ठेवणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सातत्याने सांगितलं जातंय. संयमाच्या या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी टीकास्त्र सोडलंय. "यापेक्षा काय संयम असतो? तुम्ही तीन महिने मागितले तेव्हा आम्ही दिले. तुम्ही 30 दिवस मागितले तेव्हा आम्ही 40 दिवस दिले."
"संयम कसा असतो साहेबांनी सांगावं तुमच्या तोंडातून आम्हाला ऐकायचं आहे. तुम्हीच या राज्याचे प्रमुख आहात. पालकत्वच तुमच्याकडे आहे संयम म्हणजे काय त्याची व्याख्या सांगा?", असा प्रश्न जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. तब्येत दोन दिवसात बरी झाली तर आंदोलनाचा सहावा टप्पा दौरा निघू शकतो, असंही जरांगेंनी यावेळी म्हटलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.