भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि जागावाटपावरूनची रस्सीखेच यामुळे महायुतीचं टेंशन वाढलंय. त्यापार्श्वभूमीवर नागपूरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मध्यरात्रीच महायुतीच्या नेत्यांची बैठक झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरात झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणूकीला सामोरं जाण्याच्या रणनीतीबद्दल चर्चा झाली. तिन्ही पक्षांचा दावा असलेल्या जागांवरही या बैठकीत चर्चा झाली. इच्छूकांची संख्या जास्त असल्याने इलेक्टिव्ह मेरीटवर उमेदवारी दिली जाणार.
या बैठकीत भाजप 150, अजित पवार आणि शिंदे गटाला प्रत्येकी 60 तर 18 घटकपक्षांना सोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात विदर्भात भाजपच मोठा भाऊ असणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्लाही या बैठकीत देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जागावाटपावर अंतिम निर्णय होऊस्तोवर माध्यमांमध्ये चर्चा न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणूकीत जोरदार मुसंडी मारल्याने मविआचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते अधिकच आक्रमकपणे सरकारवर हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे महायुतीचे नेते विधानसभेपूर्वी सावध झालेत. त्यातच आता जागावाटपांवरून खलबतं सुरू आहेत.
त्यामुळे महायुती जोर बैठका काढून ताकदीने मविआचा सामना करणार की लोकसभेप्रमाणे तिढा सोडवण्यास उशीर करून आणि महायुतीतील नेत्यांना विरोध करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार, याकडे लक्ष लागलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.