महाराष्ट्राला राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य हा प्रतिष्ठेचा सन्मान
नवी मुंबई महापालिका शहरी स्थानिक संस्थांमध्ये प्रथम
राज्यातील सहा अभिनव जलव्यवस्थापन संकल्पनांमुळे महाराष्ट्राची निवड
नवी दिल्ली : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलव्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये (2024) महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्यावतीने तो स्वीकारला. तसेच उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विभागात नवी मुंबई महापालिकेने प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आज झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार - 2024 प्रदान करण्यात आले. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी, राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, विभागीय सचिव व्ही. एल. कांथाराव व विभागाचे सचिव अशोक, के. के. मीना यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अमृता इतक्याच मौल्यवान असलेल्या जल संसाधनाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक केलं. 'भारतीय परंपरेमधे जलस्रोतांना पूजनीय मानले गेले आहे. माणूस अन्नाशिवाय काही काळ जगू शकेल, मात्र पाण्याशिवाय जगू शकत नाही, त्यामुळे पाण्याच्या संवर्धनासाठी काम करणारे कौतुकास पात्र आहेत. गेल्यावर्षी सुरू झालेल्या जलसंवर्धन जनसहभाग उपक्रमाद्वारे 35 लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना उभारल्या गेल्या आहेत. देशातील मर्यादित जलस्रोत असल्याने त्याचा वापर जपून करायला हवा. हवामान बदलाचा जलस्रोतांवर परिणाम होत असून जलस्रोतांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं, असं त्या म्हणाल्या.
'महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट राज्य' म्हणून सन्मान प्राप्त होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. राज्य सरकारने राबवलेल्या अभिनव जलव्यवस्थापन धोरणांचा आणि शेतकरी, पाणी वापर संस्था तसेच प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागाचा हा विजय आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. 'बंद नलिका वितरण प्रणाली, उपसा सिंचन प्रकल्पांचे आधुनिकीकरण, नदी जोड प्रकल्प, पम्पिंग स्टोरेज योजना, जलाशयांवर फ्लोटिंग सौर प्रकल्प आणि सांडपाणी शुद्धीकरण-पुनर्वापर या सहा अभिनव संकल्पनांमुळे महाराष्ट्राला हे यश मिळाल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
तत्पूर्वी, महाराष्ट्रातील इतर दोन संस्थांनाही महत्त्वाच्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले. “सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था” या गटात नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावलाय. तर “सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था” नाशिक जिल्ह्यातील कनिफनाथ जल/पाणी वापर सहकारी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.